Thursday, September 26, 2019

पार्टनरशिप मध्ये फार्मसी चालू करण्याच्या नावाखाली 50 लाखाची फसवणूक

सोलापूर,दि. २६ (प्रतिनिधी) आंध्रप्रदेशातील
हॉस्पिटलमध्ये औषध पुरविण्याची संधी आली असून
आपण दोघे पार्टनरशिपद्वारे फार्मसी उघडून या
ठिकाणी आपण बिजनेस करू असे सांगून फिर्यादी
कडून वेळोवेळी पन्नास लाख रुपये घेऊन फार्मसी
चालू करण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची
घटना समोर आली आहे.
याप्रकरणी विजयवाडा आंध्र प्रदेश येथील
नात्यातील दोघा व्यक्तींविरुद्ध सदर बाजार पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत आयप्पा
कोत्ता (वय ३४ राहणार रूची नगर जुळे सोला-
पूर) यांनी फिर्याद दिली असून व्यंकट संत्यनारायण
कोत्ता व वीर वेंकटा गिरीनाथ कोत्ता (दोघे राहणार
विजयवाडा आंध्रप्रदेश) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे
 दाखल झाले. यातील फिर्यादी हे गेल्या दहा वर्षापासून
 सोलापुरात एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून
काम करत आहे. तर आरोपी हे आंध्रप्रदेश येथील
फिर्यादी यांचे नातेवाईक आहे.वरील आरोपींनी सन
२०१५ ते २०१७ या कालावधीत आंध्रप्रदेश येथील
हॉस्पिटलमध्ये औषध पुरवण्याच्या नावाखाली चंद्रा
फार्मसी ही औषध कंपनी भागीदारीमध्ये उघडून
यातून वर्षाला दहा लाख रुपये नफा मिळण्याचे
आमिष दाखवून फिर्यादी कडून वेळोवेळी रोख रक्कम
घेतली. मात्र फिर्यादीने दिलेली रक्कम व्यवसायासाठी
न वापरता स्वतःकडे ठेवून फिर्यादीची फसवणूक
केली. व फिर्यादीने दिलेली ५० लाखाची रक्कम परत
मागितले असता आरोपीने फिर्यादीस दमदाटी करून
पैसे मागितल्यास तुझ्या आई-वडिलांना खलास
करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फार्मसी उघडण्याच्या नावाखाली वेळोवेळी विश्वास
संपादन करून पन्नास लाख रुपये घेऊन नात्यातील
दोघा व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे सांगत सदर
बाजार पोलीस ठाण्यात विजयवाडा आंध्रप्रदेश येथील
दोघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास
पोलीस सब इन्स्पेक्टर शेख करत आहे.