दैनिक जनमत : मुख्यमंत्र्यांच्या तुळजाभवानी दर्शनाला भाजपचा आक्षेप

Thursday, October 22, 2020

मुख्यमंत्र्यांच्या तुळजाभवानी दर्शनाला भाजपचा आक्षेप

 मुख्यमंत्र्यांच्या तुळजाभवानी दर्शनाला भाजपचा आक्षेपउस्मानाबाद - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तुळजापूर दौऱ्यात तुळजाभवानीचे दर्शन घेतले याला भाजपने आक्षेप घेतला असून ऑनलाईन दर्शन घ्यायला हवे होते याची आठवण करून दिली आहे.https://youtu.be/g6zkYDNT2Ic

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आले होते. त्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगाव, कात्री, अपसिंगा या गावाची पाहणी केली आणि त्यानंतर पत्रकारांसोबत वार्तालाप करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ते तुळजापूर मध्ये आले होते. त्यांनतर त्यांनी ठाकरे घराण्याची कुलस्वामीनी असलेल्या तुळजाभवानीची महाद्वार येथे जात पूजा करून दर्शन घेतले. हाच मुद्दा पकडत भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने देवीच्या भक्तांना तुळजापुरात न येण्याचे आवाहन केले होते तसेच तुळजापूर येथे प्रवेश बंदी देखील केली गेली आहे. त्यामुळे अनेक भक्त हे देवीच्या दर्शनापासून वंचित आहेत. असे असताना देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना असणाऱ्या विशेष अधिकाराचा वापर करत महाद्वारातून दर्शन घेतले आहे. यालाच भाजपने विरोध केला असून भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी देवीचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी केली आहे.