दैनिक जनमत : मुंबईवरून सांगलीत परतलेल्या एसटी महामंडळाच्या ४२५ पैकी १०२ वाहक व चालकांना कोरोनाची लागण

Tuesday, October 27, 2020

मुंबईवरून सांगलीत परतलेल्या एसटी महामंडळाच्या ४२५ पैकी १०२ वाहक व चालकांना कोरोनाची लागणतासगाव आगारातील २४ चालक - वाहक कोरोना बाधित

मुंबईत सेवेदरम्यान लागण तासगाव आगारात खळबळ

तासगाव प्रतिनिधी

     मुंबई येथे बेस्ट वाहतूक सेवेला मदत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक डेपोतून हजारो बसेस व हजारो वाहक व चालक यांना मुंबई येथे एसटी महामंडळाची सेवा बजावण्यासाठी पाठवले होते. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील ४२५  वाहक व चालक हे आपापल्या डेपोत परतले होते. परंतु या ४२५ पैकी १०२ वाहक व चालकांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

   यापैकी   तासगाव बस आगारातील तब्बल  २४ चालक आणि वाहकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी ४३ चालक - वाहकांच्या अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यापैकी चालक - वाहक मिळून तब्बल २४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. १८ चालक - वाहकांचे अहवाल निगेटिव्ह आले.

       दरम्यान एकाच दिवशी २४ कर्मचा-यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने तासगाव आगारात एकच खळबळ उडाली आहे. हे सर्वजण मुंबई येथे वाहतूक सेवेसाठी गेले असताना कोरोनाची बाधा झाल्याने चालक आणि वाहकांत घबराट पसरली आहे.

       मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट च्या प्रवासी वाहतुकीसाठी सेवा बजावणा-या चालक आणि वाहकांवर मोठा ताण आहे. तो कमी करण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातून प्रत्येकी दहा गाड्यासह चालक व वाहक मुंबईत प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यास पाठविण्यात आले होते. 

       तासगाव आगारातील ४५ चालक-वाहक मुंबईत सेवेसाठी गेले होते. ते परत आल्यानंतर सोमवारी ग्रामीण रुग्णालयात ४३ चालक आणि वाहकांची टेस्ट घेण्यात आली होती.

तर मुंबईहून सांगली जिल्ह्यात परतलेल्या ४२५ एसटी चालक व वाहक पैकी सांगली डेपो येथील ६, मिरज डेपो ६, इस्लामपूर डेपो ६, विटा डेपो १४, आटपाडी डेपो १५, जत डेपो १५, कवठेमहांकाळ डेपो १४, शिराळा डेपो १६, तर तासगाव डेपोतील २४ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने सांगली जिल्ह्यासह सर्व एसटी डेपो सह तासगाव डेपोत एकच खळबळ उडाली आहे.

तासगाव डेपोतील वाहक व चालक यांना पुन्हा आपल्या तासगाव डेपोत रुजू होण्यास परवानगी द्यावी या संदर्भात तासगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी मुंबई येथे एस टी महामंडळाच्या मुख्य अधिकारी यांची भेट घेतली होती हे विशेष होय. त्यासंदर्भात रोहित दादा पाटील यांनी परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते आजारी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती. परंतु महाराष्ट्रातील सर्व डेपोतील चालक-वाहकांना परत पाठवण्याच्या संदर्भात त्यांनी युवा नेते रोहित दादा पाटील यांना शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे‌. सांगली जिल्ह्यातील जे चालक व वाहक कोरोना बाधित आहेत त्यापैकी काही चालक-वाहक यांना रुग्णालयात दाखल केले आहे.तर काही चालक व वाहक यांना होम आयसोलेट केले आहे.