दैनिक जनमत : नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय - अजित पवार

Thursday, April 28, 2022

नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय - अजित पवार

 
राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकच भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिली आहे. उद्या एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्री योगी यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केली. 


इतकी वर्ष सर्व चालत आले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते? आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहीजे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सर्वांनी या गोष्टी गांभीर्याने घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल. यातून काही जखमा झाल्या तर नको ते प्रश्न निर्माण होतील, असे अजितदादा म्हणाले.


मनसेला राष्ट्रवादीची फूस नाही

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी आदरणीय पवार साहेबांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाहीत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या, असे अजित पवार म्हणाले.