Monday, May 23, 2022

२५ हजाराची लाच घेताना सापळ्यात अडकले तलाठी आणि कोतवाल

 


उस्मानाबाद - शेतीचा फेरफार मंजूर करुन घेण्यासाठी ३० हजारांची लाचेची मागणी करून त्यापैकी २५ हजार घेताना लोहारा तालुक्यातील अचलेर येथील लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सोमवार दि. २३ मे रोजी एसबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांनी सन २००५ मध्ये घेतलेल्या शेतीचा फेर फार वरिष्ठकडून मंजूर करून देण्यासाठी यापूर्वी १० हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याचे मान्य करून तसेच आज रोजी सदर कामासाठीच वरिष्ठकडून फेर फार मंजूर करून देण्यासाठी आणि ऑनलाईन नमुना नंबर ९ ची नोटीस काढण्यासाठी तक्रारदारास अचलेर येथील आरोपी लोकसेवक तलाठी युवराज नामदेव पवार(३६) व कोतवाल प्रभाकर रुपनर (३७) यांनी सोमवारी ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी २५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारली. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.


सदरील सापळा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोअ/ इफ्तेकर शेख, सिध्देश्वर तावसकर, विष्णु बेळे, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.