दैनिक जनमत : अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रीका धारकांना 30 जून पर्यंत आधार नोंदणी करणे बंधनकारक:गणेश माळी

Thursday, June 16, 2022

अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रीका धारकांना 30 जून पर्यंत आधार नोंदणी करणे बंधनकारक:गणेश माळी

 
उस्मानाबाद,दि.15(प्रतिनिधी):-शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डधारकांनी आधार क्रमांक सादर करणे आवश्यक आहे. यासाठीची शासनाकडून डेडलाईन 30 जुन ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत आधार नोंदणी न केल्यास रेशन मिळण्यास अडचणी निर्माण होणर आहेत. तालुक्यातील 22 हजार 699 लाभार्थ्यांची नोंदणी करणे अद्याप शिल्लक आहे. ज्या लाभार्थ्यांनी नोंदणी केली नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आपले रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधुन शिधापत्रीकेला आधारकार्डची नोंदणी करण्याचे आवाहन उस्मानाबाद तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.

उस्मानाबद तालुक्यातील एकूण 22 हजार 699 लाभार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करणे बाकी असल्याने दि.15 जून 2022 रोजी जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांची बैठक घेऊन सर्व रास्तभाव दुकानदार यांना 30 जून पर्यंत आधार नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्याकरीता तहसील कार्यालय, उस्मानाबाद येथे  संगणक व ऑपरेटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांनी आपले प्रलंबित असलेले लाभार्थ्यांचे आधार संकलन करुन आधार सिडींग करुन घेण्यात यावी. लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

 याबाबत जिल्हा पुरवठा निरीक्षक सचिन काळे आणि पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांनी ज्यांचे आधार सीडिंग झालेले नाही अशा लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधून आपले आधार कार्डची छायांकित प्रत जमा करावी, असे आवाहन केले. तसेच शंभर टक्के आधार सीडिंग करण्यात आलेल्या रास्तभाव दुकानदार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पुरवठा विभागातील अव्वल कारकुन निशिकांत भोज, महसूल सहाय्यक संतोष सरगुले व इतर कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.