दैनिक जनमत : वीर भगतसिंह - आजच्या तरुणांचे क्रांतिकारी प्रेरणास्थान

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, September 28, 2019

वीर भगतसिंह - आजच्या तरुणांचे क्रांतिकारी प्रेरणास्थान

वीर भगतसिंह यांचे नाव आजतागायत शहीद झालेल्या क्रांतिकारकांमध्ये सर्वात प्रमुख म्हणून अग्रगण्याने घेतले जाते. भगतसिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब मधील लायलपूर जिल्ह्यातील बंगा नामक गावात झाला होता. बंगा हे गाव सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये आहे. भगतसिंह हे शिख कुटुंबात जन्माला आले होते. ज्याचा अनुकूल प्रभाव त्यांच्यावर तो झाला होता. भगतसिंह यांच्या वडिलांचे नाव किशनसिंह तर आईचे नाव विद्यावती कौर होते. या शिख कुटुंबावरती आर्य समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. यांचे कुटुंबावर आर्य समाज व महर्षी दयानंद यांच्या विचारधारेचा  जास्त प्रभाव होता. भगतसिंहांच्या जन्मावेळी त्यांचे वडील सरदार किशनसिंग तसेच त्यांचे दोन चुलते अजित सिंह व स्वर्णसिंह हे इंग्रजांशी लढत असल्याने तुरूंगात होते. ज्या दिवशी भगतसिंहाचा जन्म झाला त्या दिवशी त्यांचे वडिल व काका या दोघांनाही जेलमधून सोडण्यात आलं होतं. भगतसिंहांच्या जन्मादिवशी वडील व काकांना तुरुंगातून सोडल्यामुळे त्यांच्या घरातील आनंद हा द्विगुणित झाला होता. भगतसिंहांच्या जन्मानंतर त्यांच्या आजीने त्यांचे नाव भाग्यवाला असे ठेवले होते याचा अर्थ चांगल्या नशीबचा होय. भाग्यवाला वरुन काही दिवसानंतर भगतसिंह या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. भगतसिंह वयाच्या 14 व्या वर्षापासूनच पंजाब मधील क्रांतीकारी संघटनांमध्ये काम करायला लागले होते शाळेमधून त्यांनी नवीच शिक्षण पूर्ण केलं.
       1923 मध्ये दहावीची परीक्षा पास झाले त्यानंतर त्यांना लग्नामध्ये अडकवण्यासाठी घरातून तयारी सुरू झाली असता भगतसिंह घर सोडून लाहोरला पळून आले पुढे ते कानपूर मध्ये गेले. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्षात इतके गुंतले की त्यांनी स्वतःचं जीवन हे देशासाठी समर्पित केले होते. भगतसिंहानी स्वातंत्र्यासाठी शक्तिशाली असणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात दाखवलं जे कर्तुत्व दाखवले ते आजच्या युवकांसाठी अत्यंत मोठा आदर्शवत प्रेरणादायी आहे. भगतसिंह यांना हिंदी, उर्दू, पंजाबी तसेच इंग्रजी व बंगला या भाषा येत असत.  यातल्या काही भाषा त्यांचे मित्र बटुकेश्वर दत्त यांनी शिकवली होती. जेलमध्ये असताना त्यांनी लिहिलेल्या अनेक लेख तसेच पत्रांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यांच्या लिखाणातून त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये भाषा, जात आणि धर्म त्यामुळे आलेल्या भेदभावावर दुख व्यक्त केले आहे. त्यांनी कोणताही समाज हा कमजोर का असतो याचे छान लेखन केले आहे. इंग्रजांनी देशातील लोकांवर जितका अत्याचार केला नसेल त्यापेक्षा जास्त वैचारीक त्रास तत्कालीन धर्म पंडीतांनी दिला होता. भगतसिंहाना इतकं ठाऊक होतं की आपण आज देशासाठीचे योगदान देत आहोत त्यामध्ये जर मी देशासाठी शहीद झालो तर भारतातील जनसामान्य लोक हे आणखीन उग्र होऊन जातील व देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकजुटीने लढतील. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे स्वातंत्र्य शक्य नाही म्हणून यासाठीच त्यांनी स्वतःला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा माफीनामा लिहून देण्यास नकार दिला होता.
        अमृतसर मध्ये 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंह यांच्या विचारांवर इतका मोठा प्रभाव झाला की लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये घेत असलेले शिक्षण सोडून दिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नौजवान भारत सभाची स्थापना केली. काकोरी हत्याकांडामध्ये रामप्रसाद बिस्मिलसह चार क्रांतिकारकांना फाशी व इतर सोळा जणांना तुरुंगवासाची शिक्षा दिल्यानंतर भगतसिंह इतके हतबल झाले की त्यांनी चंद्रशेखर आझाद यांची पार्टी असणाऱ्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नामांतर करीत त्यांनी एक नवीन नाव त्या संस्थेला दिलं त्याचं नाव होतं हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचा उद्देश सेवा, त्याग व त्रास सहन करू शकणारे नवयुवक तयार करणे. त्यानंतर भगतसिंह, राजगुरु सोबत मिळून 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक असणाऱ्या इंग्रज अधिकारी जे.पी. सॉंडर्सला गोळ्या घातल्या. ह्या कारवाईमुळे क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांनीही त्यांना पूर्ण सहकार्य केले. त्यानंतर भगतसिंह यांनी आपले क्रांतिकारी सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्याशी मिळून दिल्लीमध्ये असणारे अलीपूर रोड येथे ब्रिटिश भारत मध्ये तत्कालीन असणाऱ्या सेंट्रल असेंबली मधील सभागृहांमत 8 एप्रिल 1919 रोजी इंग्रज सरकारला जागे करण्यासाठी बॉम्ब तसेच काही पत्रके फेकले. बॉम्ब फेकल्यानंतर त्याच ठिकाणी दोघांनी आपली अटक करून घेतली त्यानंतर "लाहोर कट" या गुन्ह्यांमध्ये भगतसिंह आणि त्यांचे दोन सहकारी असणारे राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. अनेक इतिहास अभ्यासकांच्या माध्यमातून सांगण्यात येते की भगतसिंह व त्यांचे दोन सहकारी असणाऱ्या राजगुरू व सुखदेव यांची फाशी 24 मार्च रोजी सकाळी देण्याचे नियोजित होते परंतु भारतीय लोकांचा या तिघांवरती असलेल्या सकारात्मक विचारांच्या प्रभावामुळे इंग्रज सरकारने घाबरून 23 व 24 मार्चच्या मध्यरात्रीच ह्या तीन वीर क्रांतीकारकांना फाशी देऊन त्यांच्या मृतदेहाला सतलज नदीच्याकाठी अंतिम संस्कार करण्यासाठी त्यांच्या चिता पेटवून देण्यात आल्या. भगतसिंह यांचं त्यावेळेसच वय म्हणजे आयुष्य अवघं 23 वर्ष 5 महिने आणि 23 दिवसाचे होते आणि विशेष करून त्या दिवशी तारीख 23 मार्च हीच होती. फाशीची शिक्षा होण्याच्या अगोदर भगतसिंहाने इंग्रज सरकारला एक पत्रही लिहिले होते ज्यामध्ये भगतसिंह म्हणतात की भारतीय लोक हे युद्धाचे एक प्रतीक आहे. मी माफी मागणार नसुन मला फाशी देण्याच्या ऐवजी गोळी घालून मारलं तरी चालेल. परंतु असं झाले नाही भगतसिंहांच्या शहीद होण्याने भारतीय देशाला केवळ स्वातंत्र्य नाही मिळाले तर संघर्षाची गतीसुद्धा नवयुवकांमध्ये प्रेरणा स्थान बनलेला आहे ते देशासाठी व सर्व शहिदांसाठी ताईत बनले होते. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक हिंदी चित्रपट सुद्धा बनलेली आहेत ज्यामध्ये द लिजेंड ऑफ भगतसिंह, शहीद, शहीद भगतसिंह आजही संपूर्ण देश त्यांच्या बलिदानासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गंभीरतेने सन्मान पूर्ण आठवण करतो. भारत आणि पाकिस्तानच्या लोकांमध्ये भगतसिंहांना "आजादी के दीवाने" या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. पाकीस्तानमध्येसुध्दा भगतसिंहांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. ज्यांनी आपले संपूर्ण तारुण्य व संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले होते. अशा वीर भगतसिंह यांची आज  जयंती त्यानिमित्त त्यांच्या क्रांतीकारी कार्यास उत्तुंग विचारांचा अभेद्य सलाम...!!

मोहन जाधव - ९६८९८३३७२८.

(लेखक हे इतिहास अभ्यासक असुन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत)