नळदुर्ग नगरपालीकेतील अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला खिंडार पाच नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश


नळदुर्ग :- अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या 5 नगरसेवकांनी  अशोक जगदाळे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले आहे. कार्यकर्त्यांसह काही नेते सकाळी, दुपारी व संध्याकाळी वेगवेगळ्या प्रचार कार्यालयात दिसत आहेत. त्यामुळे हे राजकीय कार्यकर्ते व नेते नेमके कोणत्या पक्षाचे असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तसेच मतदारसंघात दररोज वेगवेगळी समीकरणे जुळत व बिघडत आहेत. अशीच काही राजकीय समीकरणे जुडल्यामुळे नळदुर्ग शहराच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप आला आहे.त्याची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे हे तुळजापूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना नळदुर्ग नगरपालिकेतील त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या 5 नगरसेवकांनी  बंड पुकारत ऐनवेळी पाठ फिरवून गायब झाल्यामुळे झाली. त्यामुळे अशोक जगदाळे यांच्या तंबूत खळबळ उडाली होती. हे नगरसेवक तेव्हापासून अशोक जगदाळे यांच्याशी अंतर ठेवून नॉटरिचेबल असल्याने  तर्क वितर्क लावले जात होते. मात्र अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर गायब असलेले 5 नगरसेवकांनी नळदुर्ग येथे 12 ऑक्टोबर रोजी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंग ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नळदुर्ग येथील  महायुतीच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याने  अशोक जगदाळे यांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेतील राजकीय साम्राज्याला मोठ्या प्रमाणात खिंडार पडले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आमदारकीचे स्वप्न पाहणारे  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना मोठा झटका बसला आहे.कारण अशोक जगदाळे यांनी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह  उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यावेळी त्यांची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवक  नितीन कासार, महालिंग स्वामी व इतर 1 असे तीन नगरसेवक वगळता नगरपालिकेतील गटनेता तथा नगरसेवक निरंजन राठोड,  उपनगराध्यक्षा शाहीन मासुलदार, नगरसेवक दयानंद बनसोडे, आसिफा बेगम काजी, सुनंदा जाधव हे पाच नगरसेवकांनी त्यांची साथ सोडणार हे निश्चित झाले  होते. त्यामुळे हे नगरसेवक कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. कारण 3 वर्षापूर्वी नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलला नळदुर्गकरांनी मोठ्या प्रमाणात समर्थन देऊन 12 नगरसेवक 1 नगराध्यक्ष असे 13 जणांना निवडून देऊन सत्ता दिली होती. मात्र काही वर्षांनंतर अशोक जगदाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांचे एकदम जवळचे  4 नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारत बंडखोरी केली होती. ते नगरसेवक यापूर्वीच  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज महायुतीचे उमेदवार  राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग नगरपालिकेतील वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे.कारण त्यांचे समर्थक असलेले 9 नगरसेवकांनी साथ सोडल्या मुळे 3 नगरसेवक व 1 नगराध्यक्षा आता शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी 1 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून अशोक जगदाळे यांच्यापासून अंतर ठेवून नॉटरिचेबल आहे. त्यामुळे नळदुर्ग नगरपालिकेत अशोक जगदाळे यांच्या राजकीय साम्राज्याला पडलेल्या खिंडारामुळे त्यांचा राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यात काही शंका नाही. तसेच नळदुर्ग शहराच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असलेला 1 मोठा मासा येणाऱ्या काही दिवसात आपल्या 2 समर्थक नगरसेवकासह काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment