किल्ला लढवला निष्ठावंतांनी उमेदवारी मिळाली विरोधकाला!

उस्मानाबाद- एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा उस्मानाबाद जिल्हा आता बालेकिल्ला राहिला नाही. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक राहते कि नाही अशी अवस्था होती मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः सभा घेऊन पक्षाचे डॅमेज कंट्रोल केले. अनेकांनी पक्षात नेतृत्वाची संधी मिळेल या आशेवर पक्ष बदलला नाही. मात्र विधानसभेची उमेदवारी संजय निंबाळकर  यांना जाहीर झाल्यानंतर पक्षातील खदखद बाहेर आली. पक्षात अनेकजण इच्छुक असताना भाजप- शिवसेना असा प्रवास करून आलेल्या निंबाळकरांना प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने अनेकांना धक्का बसला आणि निष्ठावंतांच्या पायाखालची वाळू सरकली. राष्ट्रवादीचे अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थितीत नसल्याने तसेच खुद्द पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलेल्या सुरेश पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादी नाराजांची मनधरणी कशी करते ते पाहावे लागेल. 
पवारांचा तो शब्द कोणी डावलला?
मी आता युवकांना संधी देणार आहे असा शब्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर सभेत दिला होता. पक्षात उमेदवारीसाठी अनेक युवक इच्छुक असताना  साठीत असलेल्या संजय निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने पक्षाध्यक्षांचा तो शब्द कोणी डावलला असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत.  

No comments:

Post a Comment