विद्येचे माहेरघर ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार सायकल फेरी साहित्य संमेलनासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याचा अनोखा प्रयोगउस्मानाबाद, दि. 19- मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी 2020 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी सर्वदूर व्हावी यासाठी विद्येचे माहेरघर असलेले पुणे ते उस्मानाबाद, अशी सायकल फेरी बुधवारी सकाळी 6 वाजता निघणार आहे. साहित्य संमेलनासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वीकारलेल्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबादकरही उत्सुक आहेत.

उस्मानाबाद येथे पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने विद्येचे माहेरघर पुणे ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार उस्मानाबाद असा सायकल प्रवास करण्याचा संकल्प संगणक अभियंता प्रथमेश तुगावकर यांनी केला आहे.

 पुणे रेल्वेस्थानक येथून बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता तुगावकर सायकलसह उस्मानाबादच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे केल्यानंतर बिगवण या ठिकाणी मुक्काम करून दुसर्‍या दिवशीचा मुक्काम कुर्डूवाडी येथे करणार आहेत. तिसर्‍या दिवशी शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद शहरात तुगावकर यांची सायकल फेरी पोहोचणार आहे. साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी त्यासोबत तरूणाईमध्ये सायकलविषयी आस्था वाढावी याकरिता त्यांनी हा अफलातून प्रयोग अंगीकारला आहे.

नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेले तुगावकर हे मूळचे उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले तुगावकर लवकरच विदेशातील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये रूजू होत आहेत. तत्पूर्वी आपल्या गावी होत असलेल्या साहित्य संमेलनाबद्दलची आस्था व्यक्त करण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे सायकलफेरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान त्यानिमित्ताने महाराष्ट्रासमोर यावे, असा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

साहित्यसेवा करण्याची ही छोटी संधी ः तुगावकर

कविता, गझल लेखन त्याबरोबरच आपण एक सायकलिस्ट आहोत. दररोज ऑफिसला जातानाही आपण सायकलचा वापर करतो. सायकलींची संस्कृती तरूण पिढीमध्ये वाढावी यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण सतत प्रयत्नशील असतो. त्यातूनच साहित्य संमेलनाचे निमंत्रण सर्वांना देण्यासाठी या सायकल फेरीचे आयोजन केले आहे. मराठवाडा आणि त्यातल्या त्यात उस्मानाबाद परिसराने मराठी, उर्दू आणि दखणी या तीन भाषांना जन्म दिला आहे. हे साहित्यिक योगदान खूप मोठे आहे. त्याची सेवा करण्याची छोटीशी संधी आणि त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आपण विद्येचे माहेरघर ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार असा सायकल प्रवास करणार असल्याची माहिती प्रथमेश तुगावकर यांनी दिली

No comments:

Post a Comment