आटपाडी तालुक्यात कोरोनाने खाते खोलले! जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20आटपाडी दि.19 (लक्ष्मणराव खटके):
आटपाडी तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून तालुक्‍यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने खाते खोलले आहे.आटपाडी शहरामध्ये हा रुग्ण सापडला आहे.
            आटपाडी येथे 29 वर्षाचा युवक दि.13 रोजी दिल्ली येथून पत्नी व तीन वर्षीय मुलगी समवेत आला होता.त्यामुळे त्यांना आटपाडी येथे एका लॉजवर कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.लक्षणे आढळल्याचे व किरकोळ ताप आल्यावरुन त्याला तपासणीसाठी पाठवले व मिरज सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. त्याचा स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो कोविंड 19 पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्याची पत्नी व मुलगीही आयसोलेशन कक्षात असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तो राहत असलेल्या लॉजपासून पाचशे मीटर अंतराचा परिसर सील करण्यात आला आहे.
आटपाडी तालुका आतापर्यंत कोरोनामुक्त राखण्यामध्ये प्रशासनाने मोठी जबाबदारी पार पाडली होती. परंतु गावाकडे येणारे लोंढेच्या लोंढे व त्यातून  कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढत असतानाच आज त्यावर शिक्कामोर्तब झाले.
तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. तहसीलदार सचिन लंगुटे, आटपाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी  मधुकर देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम,आरोग्य कर्मचारी गणेश राक्षे, आबासाहेब हाके तसेच प्रशासकीय व आरोग्य विभागाने तो राहत असलेल्या लॉजवर माहिती घेतली. पोलिस यंत्रणा आणखी सतर्क झाली असून संचारबंदीबाबत उपाययोजना करीत आहे.
दरम्यान,आटपाडी शहर आजपासुन विशिष्ट अटींवर सुरू करण्यात येणार होते.मात्र रात्री हा अहवाल समजताच वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता आटपाडी शहर पूर्णपणे बंद करण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला.


सांगली जिल्ह्यात 20 कोरोनाबाधित रुग्ण

 आटपाडीसह सांगली जिल्ह्यात काल दोन रुग्ण सापडले. कुंडलवाडी येथील कोरोणाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईक इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता. या व्यक्तीचा इस्लामपूर येथे स्वाब  घेण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला.कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात उपचाराखालील कोरोणाबाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post