आटपाडी दि.10(प्रतिनिधी):
कर्नाटकातून कराडला आयशर टेम्पोमधून सुमारे 14 लाख,52 हजार रुपये किंमतीचा गुटखा घेऊन जात असताना आटपाडी पोलिसांनी सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावर पकडून कारवाई केली. 7 मे रोजी रात्री 2 वाजता ही घटना घडली. 9 मे रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटख्याच्या पोत्यांसह आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातून रेडझोन असलेल्या सोलापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना उंबरगाव चेक पोस्ट नाक्यावर कराडकडे गुटखा घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 46 बी एफ 4235) पोलिसांनी तपासणीसाठी थांबविला. टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा,मेडिकल असा स्टिकर लावलेला होता. परंतु आरटीओचा परवाना नव्हता,अधिकृत पत्र काचेवर चिकटवले नव्हते. त्यामुळे दाट संशय आल्याने पोलीस शिपाई नाईक, घोरपडे, विशाल चव्हाण,देशमुखे व पोलीस मित्र यांनी कसून तपासणी केली. त्या टेम्पोच्या हौदात मागील बाजूस भुशाची पोती व त्यापुढील आतील बाजूस गुटख्याची पोती असल्याचे आढळून आले.टेम्पोचालक रूपचंद प्रेमचंद पांडे (वय 40,रा. महु,मध्य प्रदेश) याच्यासह 10 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो व 14 लाख,52 हजार, 288 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला.
परंतु हा गुन्हा नोंद होण्यास दोन दिवस उशीर लागला.महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारा गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी मेघना समाधान पवार यांच्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांच्या विविध नियमाखाली 9 मे रोजी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबले यांच्या सूचनेनुसार विटा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे व आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक कनकवाडी, पोलीस हवालदार नंदकुमार पवार, पोलीस नाईक खाडे, कराळे, पोलीस शिपाई देशमुखे, मोरे, अतुल माने या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
No comments:
Post a Comment