आटपाडी तालुक्यात कोरानाचे आणखी नविन दोन रुग्ण


आटपाडी दि.२१(प्रतिनिधी):

आटपाडी तालुक्यात बुधवार दि. 20 रोजी कोरोनाचे आणखी नवीन दोन रुग्ण सापडले आहेत.तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन झाली आहे.आटपाडी नजीकच्या गोंदीरा येथील मरगळेवस्ती व पिंपरी बुद्रुक या गावातील प्रत्येकी एक रुग्ण आहेत.सांगली जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी सहा रुग्णांची भर पडली आहे.
          आटपाडी शहराच्या दक्षिणेकडील गोंदीरा भागातील मरगळेवस्ती येथील 65 वर्षे वयाची व्यक्ती मुंबई(ठाणे)हून दि.17 मे रोजी आली. घराशेजारी झोपडीमध्ये ती व्यक्ती क्वारंटाईन झाली होती. परंतु सार्वजनिक ठिकाणी फिरू लागल्याने शाळेमध्ये क्वारंटाईन होण्यास विनंती करूनही त्या कुटुंबाने नकार दिल्यामुळे शाळेमध्ये लवकर क्वारंटाईन होणेबाबत प्रशासनाने नोटीस दिली. दुसऱ्या दिवशी दि.१८ रोजी रात्री ८.३० वाजता राजारामबापू हायस्कूल येथे क्वारंटाईन केले.त्यास वेगळी खोली देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.19 रोजी सकाळी थोड्या प्रमाणात खोकला येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मिरज येथील कोरोना सेंटरमध्ये पाठवले.बुधवार दि.20 रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरी बुद्रुक येथील अकोल्याहून आलेल्या व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे.
        दरम्यान सांगली जिल्ह्यात बुधवारी नवीन सहा रुग्णांची भर पडली असून कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईहून आलेल्या दोन व्यक्ती, शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेली एक व्यक्ती, मिरज येथील भारतनगर हडको कॉलनीतील एक महिला यांच्यासह आटपाडी तालुक्यातील दोन व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
      आटपाडी ग्रामपंचायत हद्दीत दोन रुग्ण सापडल्यामुळे प्रशासन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सज्ज झाले आहे. तहसीलदार सचिन लंगुटे,गट विकास अधिकारी मधुकर देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, पोलीस व तालुका प्रशासन सतर्कतेने प्रतिबंधक उपाय राबवित आहे.
           बाहेरगावाहून आलेले नागरिकच कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी कोणाशीही संपर्कात न येता योग्य त्या सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.प्रशासनाने ठरवून दिलेले नियम जर पाळले तर कोणालाही कोरानाची लागण होणार नाही,त्यामुळे सर्वांनी आपली,आपल्या कुटुंबीयांची व आपल्या गावाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही घाबरून जाऊ नये,कोरोना संदर्भात कोणतीही आपणास अडचण आल्यास कधीही आपण मेसेज किंवा फोन करा असे आवाहन आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील  यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post