राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे निव्वळ नाटक- नितीन काळे



उस्मानाबाद -राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन म्हणजे निव्वळ नाटक असून
जनतेचा खरंच कळवळा असेल तर महाविकास आघाडी सरकारला इंधनावर लावलेले अधिभार शून्य करायला सांगा  अशी खरमरीत टीका भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदीचा पाचवा टप्पा सुरु आहे. मात्र इंधन विक्री कमी झाल्याने सरकारचा कर महसूल आटला आहे. कर उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रासह देशातील महाराष्ट्र सरकार सह अनेक राज्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवला आहे.
आंदोलन करणारी राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. अर्थ खाते त्यांच्याकडेच आहे. मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार लावला होता. ३१ मे च्या मध्यरात्रीपासून पुनः एकदा यांच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढवल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लीटर दोन रुपये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात आता पेट्रोलवर राज्य सरकारने लावलेला अधिभार प्रतिलिटरला १० रुपये १२ पैसे, तर डिझेलवरचा अधिभार प्रतिलिटरला ३ रुपये झाला आहे. राष्ट्रवादीला खरंच जनतेबद्दल कळवळा असेल तर त्यांनी आपल्या सरकारने पेट्रोल,डिझेलवर लावलेला अधिभार कमी केला तर पेट्रोल १० रुपयांनी व डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होईल.
ज्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे असे राष्ट्रवादीचे अनुभवी मंत्री इंधन दरवाढी बाबत का चुप्पी साधून आहेत ? पक्षाचे सरकार मध्ये सामील घटक याबाबत गप्प राहतात आणि स्थानिक कार्यकर्ते आंदोलन करतात यावरूनच हे आंदोलन म्हणजे निव्वळ नाटक आहे हे स्पष्ट होत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post