बार्शी प्रतिनिधी - गणेश घोलप
कोरोना या महाभयंकर विषाणूं आजारामुळे संपुर्ण जगभरात आहाकार असताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर व तालुकातही वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे बार्शी शहर व तालुका सर्वत्र चर्चेत आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी यात स्वत: लक्ष घातल्यानंतर बार्शीसाठी सोलापूरचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या कडे बार्शी शहर व तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या अटोक्यात आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वतः प्रांताधिकारी हे बार्शी येथे मुक्कामी असून त्यांनी शहरातील विविध भागात व वैराग येथे भेटी देऊन क्वारंटाईन केलेल्या रुग्णांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाय काढत त्यांचे समाधान केले. शहरातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याशी बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या तसेच आढावा घेतला. बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत कोरोना आजार नियंत्रणासाठी नगरसेवकांनी मदतीचे आश्वासन दिले.
प्रातांधिकारी हेमंत निकम यांनी स्वतः शहरातील ग्रामीण रुग्णालय, डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल, डॉ. अंधारे हॉस्पीटल,कॅन्सर हॉस्पीटल, सोमाणी हॉस्पीटल, शहरातील विविध कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर आदींना प्रत्यक्ष भेटी देऊन हॉस्पीटल व सेंटर ना सुचना देऊन आढावा घेतला.
बार्शी शहरातील व वैराग येथील कोविड सेंटर,क्वारंटाईन सेंटर येथील रुग्णांच्या समस्या मार्गी लावीत त्यांचे प्रश्न सोडविले.
बार्शी शहरात दोन व वैराग येथे स्वतंत्र एक पथकामार्फत स्वॅब घेण्याची व्यवस्था चालू केली. बार्शी शहरात व वैराग येथे नागरिकांच्या अँटीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहेत त्यामुळे रिपोर्ट लवकर मिळत आहेत. प्रत्येक कोवीड व क्वारंटाईन सेंटरला अधिकाऱ्यांच्या व डॉक्टरांनी दररोज भेटी देण्याच्या सूचना दिल्या व आढावा घेतला जात आहे. बार्शी शहरात व वैराग येथे नव्याने शाळा व मंगल कार्यालये ताब्यात घेतल्या असून यात रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवठा होतो का नाही यासाठी ठेकेदार यांच्या भोजन कक्षास स्वतः भेट देऊन मालाच्या दर्जाची तपासणी केली.
दवाखान्यातील आरोग्य कचऱ्याची विल्हेवाट साठी स्वतंत्र यंत्रणा लावली आहे.रूग्णांच्या करमणूकी व मनोरंजनासाठी टीव्ही, साऊंड सिस्टीम आदींची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
विलगीकरण कक्षांत शौचालयांची संख्या कमी असेल त्या ठिकाणी फिरते शौचालय चा वापर करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेच्या २० टीम, आशावर्कर आणि अंगणवाडी , सेविका, शिक्षकांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम वेगात सुरू असून शहरातील स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश नगर पालिकेला दिले आहेत.
या कामात तहसिलदार कुंभार,मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.व्ही. होनमुटे,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड, वैद्यकिय अधिकारी शितल बोपलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बार्शी तालुका पोलिसचे शिवाजी जायपात्रे, वैरागचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर,वैरागचे वैद्यकिय अधिकारी डॉ.जयवंत गुंड,डॉ.अजित सपाटे, न.पा.चे आरोग्य अधिकारी विजय गोदेपुरे व आरोग्य विभाग व पोलिस विभाग आदींचे सहकार्य मिळत आहे.