वायफळे ग्रामपंचातीसमोर शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन


  • जवानाला दमबाजी केल्याचे प्रकरण : उपसरपंच अशोक नलवडे यांच्या राजीनाम्याची मागणी


तासगाव : प्रतिनिधी
वायफळे (ता. तासगाव) येथील दिलीप नलवडे या जवानाला क्वारंटाईन कालावधीत विविध अडचणींना सामोरे जावे लागले. आपल्या समस्या या जवानाने सोशल मीडियावर मांडल्यानंतर उपसरपंच अशोक नलवडे यांनी या जवानाला दमबाजी केली. याप्रकरणी नलवडे यांनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी वायफळे ग्रामपंचायतीसमोर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी धरणे आंदोलन केले.

     आंदोलनस्थळी ते म्हणाले, दिलीप नलवडे या जवानाला वीज व पाण्याची सोय नसलेल्या अंधाऱ्या खोलीत दोन - तीन दिवस क्वारंटाईन करणाऱ्या ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन समितीची चौकशी करावी. या जवानाला दमबाजी करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या उपसरपंच अशोक नलवडे यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी जाहीर माफी मागत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

      बाळासाहेब देसाई हायस्कुल या शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. याठिकाणी वर्ग भरवू नयेत. या शाळेच्या नूतन इमारतीच्या कामास तातडीने आरंभ करावा. तसेच हायस्कुल शाळेची कौले फुटली आहेत. त्यामुळे शाळा गळत आहे. खोलीत घुशीने उकिर काढला आहे. कौलात झाले उगवायला लागली आहेत. खोल्यांना खिडक्या नाहीत. दारे तुटली आहेत. एकूणच शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे यापुढील काळात ही शाळा क्वारंटाईनसाठी वापरू नये.

     आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव, वायफळे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, राजेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पाठींबा दिला. तर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी भेट दिली.

     दरम्यान, उपसरपंच अशोक नलवडे यांनी जवानाच्या बाबतीत जो काही प्रकार घडला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शिवाय बाळासाहेब देसाई हायस्कुल या शाळेचे काम एक वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे लेखी आश्वासन दिले. त्यांनतर पवार यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post