पोखरा योजना लक्षांकाविना व पुर्वसंमतीपत्रासह तातडीने राबविण्याची आ. कैलास पाटील यांची रस्तोगी यांच्याकडे मागणी


उस्मानाबाद 
पोखरा योजना लक्षांकाविना व पुर्वसंमतीपत्रासह तातडीने राबविण्यात यावी अशी मागणी आ. कैलास पाटील यांनी राज्य प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे केली. प्रकल्प संचालक रस्तोगी हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करुन यातुन मार्ग काढण्याबाबत त्यांना विनंती केली असल्याचे आ. कैलास पाटील यांनी सांगितले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली योजना म्हणुन पुढे आली आहे. असे असताना मध्यंतरी यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आहेत.   
मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 287 गावामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 48, दुसऱ्या टप्प्यामध्ये 137 तर तिसऱ्या टप्प्यात 102 गावांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्यस्थितीत पोखरांतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी पुर्वसंमती देणे शासनाच्या स्तरावरुन बंद करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुर्वसंमती पत्र देण्याचे थांबविले आहे,पण ते फक्त वैयक्तीक योजनेपुरते मर्यादीत आहे.येत्या काही दिवसात त्याचाही विषय निकाली काढण्यात येणार असल्याचे श्री.रस्तोगी यानी आ. पाटील यांच्याशी चर्चा करताना  सांगितले.
जिल्ह्यांना,तालुक्यांना दिलेल्या लक्षांकापेक्षा अधिक अर्ज आले तर प्राप्त अर्ज मंजुरीबाबत अडचणी येत असल्याची बाब त्यांच्या निर्दशनास आणुन दिली. जिल्ह्यासह मतदारसंघात शेतकऱ्यांची शेळी, ठिबक, विद्युत मोटार, पाईप संच इत्यादी खरेदी केले असुन शेतकऱ्यांच्या पुर्व संमती रद्द झालेल्या आहेत. त्या पुर्व संमती पुन्हा मिळवुन देण्याची मागणी श्री. रस्तोगी यांच्याकडे केली. त्यावर त्यानी लक्षांकाविना भविष्यात ही योजना सूरु होणार असल्याचा विश्वास दिला.जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्पाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांपैकी पाईप, पंपसंच, यांत्रिकीकरण, नवीन विहिर यासाठी आर्थिक लक्षांक ठरवून देण्यात आला आहे. फळबाग व वृक्षलागवड, शेडनेट हाऊस,पॉलीहाऊस, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन,गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, गांडूळखत युनिट,कंपोस्ट उत्पादन युनिट, सेंद्रीय निविष्ठा उत्पादन युनिट, वैयक्तिक शेततळे,भूजल पुनर्भरण,ठिबक व तुषार संच तसेच हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणीत बियाण्यांचे बीजोत्पादन करणे या घटकांसाठीही आर्थिक लक्षांक किमान ठेवण्यात आला आहे. याबाबतीत सुध्दा विचार करण्याची विनंती केल्यानंतर श्री.रस्तोगी यानीही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.येत्या वर्षभरात या योजनेची आर्थिक स्थिती रुळावर येऊन ही योजना पहिल्यासारखी गती पकडेल असेही श्री. रस्तोगी यानी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post