दैनिक जनमत : गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही अशापध्दतीने साजरे करण्यासाठी काटेकोर नियोजन - गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Sunday, August 23, 2020

गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही अशापध्दतीने साजरे करण्यासाठी काटेकोर नियोजन - गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई


 तासगाव प्रतिनिधी
 लोकांच्या सुरक्षिततेसाठी व गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये ही भूमिका लक्षात घेऊन घरगुती व साध्या पध्दतीने उत्सव साजरे करत आहोत. याबाबत अधिक सतर्क रहाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम सुरळीतपणे, साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व कोणत्याही पध्दतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्यास वाव मिळेल अशा पध्दतीने होणार नाहीत, ते काळजीपूर्वक केले जातील, असे काटेकोर नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गृह (गामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तासगाव येथे झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे  यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळापैकी  यावर्षी ६० ते ६५ टक्के गणेशोत्सव मंडळानी  सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही  ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना सुध्दा राबविली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सर्व पोलीस अधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या अगोदरच लोकांच्यामध्ये जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनी छोट्या स्वरूपात व घरगुती गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळे गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काल गणेशोत्सव सुरू झाला पण कोठेही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका झाल्या नाहीत. जी कार्यपध्दती गणेशोत्सवासाठी ठेवली आहे तीच कार्यपध्दती मोहरमसाठी सुध्दा ठेवली आहे. यासाठी मुस्मीम बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाले असून त्यांनी सुध्दा गणेशोत्सवाप्रमाणे मोहरम सुध्दा घरगुतीच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिरवणूका व उत्सवाचा फारसा ताण पोलीस दलावर येणार नाही. तरीसुध्दा पोलीस दल सतर्क आहे. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव घरगुती पध्दतीने व साध्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बैठक घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव मंडळानी शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असे सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्ण राज्यात कोठेही मोठे उत्सव, मंडप, डेकोरेशन नसून घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या अनुषंगाने केलेले नियोजन, बंदोबस्त, विसर्जन मिरवणूका याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली.