महेश देशमुख (पिंपळनेर)
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले व सोलापुरसह पुणे, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे आज सकाळी १०.३० च्या दरम्यान १०० टक्के भरले असून शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे.भीमा खोऱ्यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक दौंडमधून २३९९६ व बंडगार्डन २२०५५ क्युसेक झाल्याने धरण १००.११ टक्के झाले. अजुनही दौड व बंडगार्डन विसर्ग मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे.
उजनी ने शंभरी पार केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखानदार, शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस सुरूच असून धरणातील पाणी बोगद्यातून ९००, कालव्यातून ३०० क्युसेक्स आणि सीना माढा योजनेसाठी २६२ क्युसेक्सने सोडण्यात येत आहे. संध्याकाळी चार वाजता कालव्यातून ६०० क्यूसेकनी पाणी सोडले जाणार आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाने आज सकाळी अखेर शंभरीचा टक्का जवळ केला आहे.२०१८ मध्ये २७ ऑगस्ट ला, २०१९ मध्ये ७ ऑगस्ट ला तर यावर्षी ३१ ऑगस्ट ला धरणाने शंभरी पार केली. उजनी धरणातील पाण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते.
-----------------
मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण
उजनी धरण हे महाराष्ट्रातील जायकवाडी व कोयना धरणानंतर मोठे धरण असून, मृतसाठ्याबाबत सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३२० द. ल.घ. मी. (११८ टीएमसी) तर उपयुक्त साठवण क्षमता १५१७.१९ द. ल. घ. मी., मृतसाठवण क्षमता १८०२.८१ द. ल.घ. मी. उपयुक्त साठ्यापेक्षा(५३.५७ टीएमसी) मृतसाठा (६३.६५ टीएमसी) मोठे असलेले एकमेव धरण आहे. पाणलोट क्षेत्र १४८५६ चौ. कि. मी. असून, या धरणाखाली २९ हजार हेक्टर क्षेत्र, पुणे जिल्ह्यातील २५, सोलापूर जिल्ह्यातील २३ व नगर जिल्ह्य़ातील ३ गावे अशी एकूण ५१ गावे बुडाली आहेत.