माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावीपणे शेवटच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी करा- पालकमंत्री ना. जयंतराव पाटील


तासगाव प्रतिनिधी
 जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या वाढत आहे. रूग्णसंख्येची वाढ कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात जनता कर्फ्यू चालू असून हा सर्वांसाठी आहे. सर्वांनी आवश्कता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेची प्रभावीपणे शेवटच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंतराव पाटील यानी सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिका हद्दीतल व्यापारी व उद्योजक यांच्यासमवेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागातील भाजी विक्रेते आणि बाजार यामुळे होणारी गर्दी हा एक चिंतेचा विषय आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने सुरूवातीला जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे शोधून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, पोलीस विभाग गर्दीच्या ठिकाणी कडक भूमिका स्विकारेल. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोणीही एकत्रित येऊन गर्दी करू नये.
संपूर्ण जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा उद्यापासून कार्यरत होईल असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जनजीवन चालू राहील पण गर्दीच्या ठिकाणी भरणारे बाजार सर्व थांबविण्यात येतील. त्यासाठी कडक कारवाई करून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये जर अपयश आले तर लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारावा लागेल. येणाऱ्या काळात सर्वांनी कडकपणे नियमांचे पालन करावे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेल्या आलेल्या १४० ऑक्सिजन बेड्सच्या कोरोना केअर सेंटरची पहाणी करून तेथे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या कोविड केअर सेंटरमधील १४० ऑक्सिजन बेडपैकी १२ व्हेंटीलेटर व हाय फ्लो नोझल ऑक्सिजन बेड् आहेत.
तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना रूग्णांच्या वॉर्डला भेट देवून रूग्णांशी संवाद साधून विचारपूस केली व मानसिक आधार दिला. त्याचबरोबर रूग्णालयाच्या विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post