- रूग्ण संख्या वाढली तरीही कोणीही घाबरून जाऊ नये
सांगली/ तासगाव प्रतिनिधी दि.
सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच स्वत: बरोबरच कुटुंबियांना कोरोना विषाणू संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करावे, गर्दी करू नये. रूग्ण लवकर उपचाराखाली येण्यासाठी रॅपीड ॲन्टीजन टेस्ट व आरटीपीसीआर तपासणीची संख्या वाढविण्यात येत आहे. त्यामुळे जरी रूग्ण संख्या वाढली तरी कोणीही घाबरून जावू नये. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबरपासून १० दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांच्या संपादकांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनावर सहजासहजी मात करता येऊ शकते. यासाठी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटर मध्ये उपचाराखाली रहावे. प्रकृती स्थिर असल्यास होम आयसोलेशमध्येही रूग्ण बरा होऊ शकतो. घाबरून जाऊन आवश्यक नसताना कोविड हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्याचा आग्रह धरू नये. त्यामुळे गंभीर रूग्णांना बेडची उपलब्धता होण्यास अडचण निर्माण होईल. गंभीर रूग्णांना बेडची उपलब्धता व्हावी यासाठी रूग्णालयांनी गरज असेल त्यांनाच हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करावे. जर प्रकृती स्थीर झाली असेल तर रूग्णांनी स्वत:हून हॉस्पीटलमधून डिस्चार्ज घ्यावा. घाबरून जाऊन बेड अडवून ठेवू नये. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणीही एचआरसीटी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.