एचआरसीटी स्कोअर 18, ऑक्‍सिजन लेव्हल 70 आसताना होमगार्डसाठी देवदूत हाेऊन आले अतिरिक्त पाेलीस अधिक्षक अतूल झेंडे

 
 मगरवाडी/प्रतिनिधी

पंढरपूर येथे पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी कर्तव्य बजावत असताना, वडिलांना कोरोनाची (Covid-19) लागण झाली. एचआरसीटी स्कोअर (HRCT Score) 18 तर ऑक्‍सिजन लेव्हल (Oxygen Level) 70 इतके आले. त्यामुळे प्रकृती खालावली. वेळेवर बेड मिळेना, ना इंजेक्‍शन. त्यात कोरोना महामारीच्या घटना कानावर येत असल्याने समोर सर्वत्र काळोख दिसत होता. अशा संकटात असताना खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तातडीने उपचारासाठी सर्व सोयी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज आरोग्याची विचारपूस करून मानसिक आधार दिल्याने, सर्वांच्या सहकार्यामुळे या महामारीच्या काळात माझ्या वडिलांचा पुनर्जन्म झाला.

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर येथे करमाळा तालुक्‍यातील होमगार्ड कर्मचारी सोमनाथ महादेव ढेपे (वय 43) हे गेले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या उपचारासाठी दवाखान्यात धाव घेतली. एचआरसीटी केली असता स्कोअर 18 इतका आला तर ऑक्‍सिजन पातळी 70 वर व आणखी कमी होत असल्याने, बेड मिळवण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात कुटुंबप्रमुख असलेले ढेपे यांनाच कोरोनाने घेरले. तर दुसरीकडे दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या नवनवीन घटना ऐकायला मिळत असल्याने कुटुंब पूर्णपणे हवालदिल झाले."आम्ही आहोत तुमच्यासोबत !' रुग्ण, नातेवाईक, रुग्णालयांच्या मदतीसाठी सहा तरुणांची धडपड


अशा कठीण परिस्थितीत खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे पोलिस उपअधीक्षक विक्रम कदम व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी स्वतःहून पुढाकार घेत पंढरपुरात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध केले. परंतु होमगार्ड ढेपे यांना तत्काळ इंजेक्‍शन व महागड्या गोळ्या- औषधांची गरज होती. यासाठी स्वतः होमगार्डचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे यांनी अवघ्या दोन तासांत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची सोय करून दिली. तर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस कल्याण निधीतून महागड्या गोळ्या- औषधांच्या खरेदीसाठी मोठी आर्थिक मदत केली.

अत्यंत नाजूक अशी परिस्थिती असलेल्या होमगार्ड ढेपे यांच्या प्रकृतीबद्दल स्वतः अप्पर पोलिस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अतुल झेंडे व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, होमगार्ड कार्यालयातील मोरे, ठाकूर, घाडगे यांनी जातीने लक्ष घालून दैनंदिन माहिती घेऊन, कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी मानसिक पाठबळ व आधार दिला. एका कर्मचाऱ्याच्या उपचाराच्या खबरदारीसाठी स्वतःहून होमगार्ड जिल्हा समादेशकसह पोलिस प्रशासन एवढी तत्परता दाखवत असल्याने सोमनाथ ढेपे व कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला. सर्वांच्या मानसिक आधारामुळे व्हेंटिलेटरवर आरोग्याची नाजूक परिस्थिती असताना देखील, होमगार्ड सोमनाथ ढेपे यांनी दहा दिवसांत कोरोनावर मात केली आहे.

सध्या या महामारीच्या काळात नागरिकांना दररोज कित्येक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत असताना, अशात एचआरसीटी स्कोअर 18 तर ऑक्‍सिजन 70 असे कोरोनाबाधित असलेल्या होमगार्ड कर्मचाऱ्यासाठी होमगार्ड जिल्हा समादेशक ते सर्व पंढरपूर पोलिस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यामुळे होमगार्ड ढेपे यांनी कोरोनावर मात केली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केल्याने, तसेच पंढरपूर पोलिसांनीही होमगार्ड ढेपे यांच्या उपचारासाठी अथक प्रयत्न केल्यामुळे व ढेपे यांनी कोरोना झाल्यानंतर दाखवलेली मानसिक स्थितीही महत्त्वाची होती. त्यामुळे ते लवकर कोरोनामुक्त झाले. पोलिस कर्मचारी व होमगार्ड असा कोणताही दुजाभाव नसतो. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठीही आम्ही सदैव तत्पर आहोत.


- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

No comments:

Post a Comment