दैनिक जनमत : तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, June 8, 2021

तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन'स्वा. शेतकरी संघटनेच्या वतीने चिंचणी नाक्यात रास्ता रोको

(तासगाव प्रतिनिधी)

      तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. ऊस नेऊन पाच महिने होत आले तरी अनेक शेतकरी बांधवाना एक रुपयाही दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांच्यासह कार्यकर्त्यां शेतकऱ्यांनी सोमवारी येथील चिंचणी नाक्यात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयावर पर्यंत चालत घोषणा देत जाऊन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.


      यावेळी शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांना पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाही कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली आहे. 


      खासदार पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने जानेवारीपासून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप दिली नाहीत. ही बिले मिळावीत, यासाठी शेतकरी कारखाना स्थळावर हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांची कोणीही दखल घेत नाही स्वतःला   शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे खासदार पाटील यांनी कष्टाळू शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली १६ एप्रिल रोजी नागेवाडी कारखान्यासमोर आंदोलन केले होते. यावेळी खासदारांनी तिस एप्रिलपर्यंत बिले देण्याचा शब्द दिला होता. मात्र एप्रिलनंतर मे संपून जून महिना सुरू झाला तरी अद्याप शेतकऱ्यांना बिले मिळावी नाही. खासदारांनी आपला शब्द पाळला नाही, असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


     दरम्यान, खासदार पाटील यांच्याकडून ऊस बिले देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी तासगाव येथील चिंचणी नाक्यात रास्ता रोको केला. त्यानंतर *'बुडव्या साखर सम्राटांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एकच गट्टी, राजू शेट्टी'* अशा घोषणा देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर सम्राट यांचा निषेध केला,

 लॉकडाऊनमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामासाठी बि - बियाणे, खते घेण्यासाठी बळीराजाकडे पैसे नाहीत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी कारखानदारांच्या दारात जाऊन भीक मागावी लागत आहे. पण आता आम्ही अटीतटीची लढाई लढू. ऊस बिल पदरात पाडूनच घेऊ. संजयकाका पाटील यांना शेतकऱ्यांनी दोनवेळा खासदार केले. मात्र त्यांनाच ठेंगा दाखवला जात आहे. जर शुक्रवारपर्यंत बिले मिळाली नाहीत तर खासदारांच्या बंगल्यासमोर बेमुदत ठिय्या मारणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांनी दैनिक जनमत शी बोलताना व्यक्त केली आहे.


      आंदोलनात जिल्हा अध्यक्ष खराडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अशोक खाडे, दामाजी डुबल, राजेंद्र माने, शशिकांत माने, संदेश पाटील, सचिन पाटील, महेश पाटील, अनिल पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते:

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी चोख पोलिस पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, साहेब पोलीस निरीक्षक केराम, पोलीस उपनिरीक्षक गुरव,एल आय बी चे आप्पासाहेब साबळे, इत्यादींनी बंदोबस्ताचे चोख व्यवस्था ठेवली होती बराच वेळ ट्राफिक व्यवस्था कोडमोडल्यानंतर ट्राफिक विभागाच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे योगदान दिले होते हे विशेष होय.