दुर्मिळ अशा शृंगी घुबडाला मिळाले जीवदान

 
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील पर्यावरणप्रेमी सिध्देश्वर भंडारे यांना सकाळी त्यांच्या शेतात शिंगवाले अर्थात शृंगी घुबड जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला उडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक प्रा.मनोज डोलारे यांच्याशी संपर्क साधला.
वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके, प्रा.मनोज डोलारे, प्रा.विवेक कापसे यांच्या चमूने ताबडतोब घटनास्थळी भेट देवून प्रथमोपचार केले.
याबाबत माहिती देताना प्रा.मनोज डोलारे यांनी सांगितले की, सदर घुबड हे शृंगी (शिंगवाले) घुबड असून त्याच्या उजव्या पंखाचे हाड मोडले असल्याने त्याला सध्यातरी उडता येणे शक्य नाही. झालेली जखम ही काही दिवसांपूर्वी झालेली असल्याने जखमेचा संसर्ग वाढला आहे. उलूक कुळातील घारीपेक्षा मोठा असणा-या ह्या घुबडाच्या डोक्यावर दोन्ही बाजूंना काळ्या पिसांचा एकेक झुपका असतो. हे झुपके शिंगासारखे दिसतात म्हणूनच त्याला शृंगी हे नाव पडलंय. इंग्रजीत त्याला Indian Eagle Owl/Great Horned Owl अशी नावे आहेत. मत्स्य घुबडाप्रमाणे हा संपूर्ण निशाचर नाही, कारण तो दिवसाढवळ्यासुध्दा हिंडताना दिसतो. खडकावर किंवा झुडपाच्या आश्रयाने तो आपला दिवसाचा वेळ घालवतो. सायंकाळी खोल, गंभीर घुमणा-या आवाजाने याच्या अस्तित्वाची जाणीव होते.
पंखाची जखम जास्त असल्याने त्या शृंगी घुबडाला उपचारासाठी उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे डाॅ.सुदर्शन मुंढे आणि त्यांचे सहकारी डाॅ.महेश हंगरकर यांनी उपचार केले.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके यांनी सांगितले की जखम पूर्णपणे भरुन येण्यास जवळपास दहा लागणार आहेत. उडता येत नसल्याने आणि तो पूर्णतः मांसाहारी असल्याने त्याची काळजी घेण्याची गरज आहे. तोपर्यंत आमची वनविभागाची टीम आणि प्रा.मनोज डोलारे त्याची काळजी घेणार आहोत. उडण्याक्षम झाल्यानंतर त्याला परत भंडारवाडीच्या शिवारात सोडले जाणार आहे.
घुबड पक्षाविषयी अधिक माहिती देताना प्रा.मनोज डोलारे म्हणाले की, पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. पाश्चात्य जगात बुद्धिमानपणाचे प्रतीक मानले जाणारे आणि पुराणांमध्ये लक्ष्मी देवीचे वाहन असणारे घुबड आपल्याकडे अपशकुनी का समजले जाते हा प्रश्नच आहे. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. निशाचर असल्याने आणि त्याचे भीतीदायक डोळे आणि घूत्कार यामुळे मानव त्याला घाबरतो. वस्तुतः निसर्गात टिकून राहण्यासाठी निसर्गाने त्याला तसे बनवले आहे.
घुबडांच्या जगभरात जवळपास २०० जाती आहेत. अंटार्क्टिका सोडला तर पूर्ण पृथ्वीभर त्यांचा वावर आहे. भारतात जवळ जवळ ६० प्रजाती आणि उप-प्रजातींचे घुबड आढळतात. आपल्याकडे बार्न आउल किंवा गव्हाणी घुबड, पिंगळा हे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय डोक्याजवळची काही पिसे शिंगासारखी उभी राहत असल्याने शृंगी घुबड हे जंगलातून किंवा कडेकपाऱयातून दृष्टीस पडते.
मोठय़ा झाडांच्या ढोलीत जोडीजोडीने दिसणारे पिंगळा हे घुबडाचेच भाईबंद आहेत. यातलाच रानपिंगळा ही जात दुर्मिळ श्रेणीत पोहोचली आहे. घुबड अत्यंत उत्कृष्ट शिकारी असतात. हे लहान किडे, उंदीर किंवा पक्षी खातात. मोठी घुबडे ससे, घुशी, साप यावर उपजीविका करतात. भक्ष्य मोठे असल्यास पंखात पकडून लचके तोडून खातात. लहान प्राणी अख्खा गिळतात. अन्नाचे पचन झाल्यावर न पचलेली भक्ष्याची हाडे, पिसे, केस या पदार्थांचे गोळे बनवून ते ओकून टाकतात.
घुबड शेतकऱयांच्यासाठी उपयुक्त पक्षी आहे. उंदीर, घुशी हे प्रमुख भक्ष्य असल्याने मानवाला उपकारकच आहे. घुबड त्याची शिकार अख्खी गिळतो आणि वर्षभरात सुमारे १००० उंदीर खातो. उंदीर हे घुबडांचे आवडते खाद्य असल्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा मित्र ही समजले जाते.
काही ठिकाणी घुबडांना पाळण्यासाठी पकडले जाते तर जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच घुबडांबद्दल समाजात अजूनही अपसमज आहेत.
२०१६ मध्ये लालबागच्या राजाला पण घुबडावर विराजमान केले होते. समाजातून घुबडाबद्दलचे अपसमज दूर करण्यासाठी हे प्रयत्न हळूहळू का होईना सफल व्हावेत आणि या देखण्या आणि उपयुक्त पक्ष्याला आपण त्याचा मान मिळवून देऊ.

No comments:

Post a Comment