दैनिक जनमत : पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Friday, July 23, 2021

पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान

 
अंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी येथे घरावर दरडी कोसळून जीवित व वित्त हानी

अंबेघर येथे १२ जणांचा मृत्यू तर मिरगाव येथे ११ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती

ढोकावळे येथे ९ तर हुंबरळी येथे २ घरे वाहून गेली.

प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी, मदत कार्यात मोठे अडथळे

एनडीआरएफच्या टिमसह भारतीय सेनेला पाचारण.

किल्ले मोरगिरी, टोळेवाडी, गुंजाळी, कवडेवाडी, मेष्टेवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन.

कोयना धरणाचे दरवाजे १० फुटावर. नदीपात्रात ४४,६२० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

पाटण : तालुक्यात निसर्गाचा महा जलप्रकोप शुक्रवारीही सुरू असून अंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी येथे अनेक घरांवर दरडी कोसळल्या आहेत. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. अंबेघर येथे १५ ते २० जण मिरगाव येथे ११ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, भारतीय सेनेसह स्थानिक जनतेचे मदतकार्यास सुरू आहे. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून तसेच पाण्याखाली गेल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. किल्ले मोरगिरी, टोळेवाडी, गुंजाळी, कवडेवाडी, मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. टोळेवाडी-काटेवाडी या गावांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे १० फूटाने उचलण्यात आले असून नदीपात्रात प्रतिसेकंद ४४ हजार ६२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग सुरू होण्यापूर्वीच तुडुंब भरून वाहत असलेल्या कोयना नदीने रौद्ररूप धारण केले आहे. कोयनेसह, केरा, मोरणा, काजळी, काफनी, वांग, मांड तारळी या नद्यासह ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जनतेने सुरक्षित ठिकाणी राहवे व विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे.

मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन ठप्प केले आहे. येथील नवीन बसस्थानकासह परिसरातील दुकाने, हॉटेल तसेच येथील श्रीमंत दादासाहेब पाटणकर नगरमधील नागरी वस्तीत पाणी घुसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोयना पाणलोट क्षेत्रासह सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना व केरा नदीला पूर आला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास मुळगाव पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच नेरळे पुलही पाण्याखाली गेला असून तेथील काही घरात पुराचे पाणी घुसले आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

कोयना नदीला मोठा पूर आला आहे. पंधीत मुळगाव पूल पाण्याखाली गेला असल्याने नदी पलीकडील मुळगाव, कवरवाडी, त्रिपुडी, चोपडी, आदी गावांचा येथून असणारा संपर्क तुटला आहे. केरा विभागातही वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून केरा नदीलाही पूर आला आहे. दरम्यान, कोयना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे केरा नदी व शहरातील ओढ्यांना पाणी चढल्याने नवीन बसस्थानक, कराड-चिपळूण महामार्गावर पाणी आले आहे. बसस्थानक, सह्याद्री कॉम्प्लेक्स व धांडे पूल परिसरातील विविध दुकाने, हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. येथील झेंडा चौकातून कळके चाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावरील मागील महिन्यात खचलेला पूल पाण्याखाली गेला आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पावसामुळे शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील जनजीवन ठप्प झाले असून पावसाचा जोर न ओसरल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुरुवारी सायंकाळी ४ ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोयनानगर येथे ४७४ (२५९०), नवजा ५८६ (३४२२), महाबळेश्वर ४५८ (३१९२) इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणाची जलपातळी २१४७.०५ फूट, ६५४.४०६ मीटर झाली असून एकूण पाणीसाठा ८५.५९ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ८०.४७ टीएमसी झाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मिळाली ३ कोटींची थकहमी

  धाराशिव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद, नांदेड व मुंबई या बँकांनी सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासना...