उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद शहरातील अनेक नागरिक विविध क्षेत्रात काम करीत असून त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे. त्यामुळे यापुढे नगर परिषदेच्या स्थापना दिनी म्हणजे दि.२५ मे रोजी फक्त एक उस्मानाबाद भूषण व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणीजणांचा कार्य गौरव पुरस्कार देऊन प्रत्येक वर्षी सन्मान करण्यात यावा, असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
उस्मानाबाद नगर परिषदेच्यावतीने दि.१५ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करुन शहराचे नावलौकीक करणाऱ्या व्यक्तींचा उस्मानाबाद भूषण पुरस्कार पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नप गटनेते सोमनाथ गुरव, मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले की, उस्मानाबाद नगर परिषदेची स्थापना दि.२५ मे १९५८ साली झाली आहे. नगर परिषदेच्या शिक्षकांनी कोरोना कालावधीत प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याबाबत सर्व माहिती एकत्रितपणे गोळा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी पुन्हा तीनवेळा घरोघरी जाऊन सर्व नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेऊन सर्व माहितीचा डेटा गोळा करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केल्याचे सांगितले. तर नगर परिषदेच्यावतीने या काळात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच या शहरातील अनेक नागरिक विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांचा सन्मान व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नगर परिषदेने दरवर्षी त्या-त्या क्षेत्रातील व्यक्तींना उस्मानाबाद भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, असा ठराव नगर परिषदेने एकमुखी घेतला आहे. त्यामुळे देण्यात येणारे पुरस्कार कोणाला द्यायचे ? हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप नसतो. या पुरस्कारांमध्ये प्रशासकीय सेवा, कला, साहित्य, क्रीडा व सामाजिक क्षेत्र अशा सर्व क्षेत्रातील गुणवंत व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी हा पहिला प्रयत्न असून त्यास चांगले यश आले आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पाठबळ देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा उपक्रम यापुढे देखील नगर परिषदेने कायम सुरू ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी २०२० या वर्षीचा उस्मानाबाद भूषण पुरस्कार माजी न्यायमूर्ती तथा माजी लोकायुक्त पुरस्कार पुरुषोत्तम गायकवाड यांना जाहीर झाला असून ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्यामध्ये क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर जिल्ह्याचा नावलौकिक केल्याबद्दल अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा क्रीडा अधिकारी सारिका काळे, डॉ.चंद्रजीत जाधव व राम हिरापुरे यांचा तर वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः कोरोना कालावधीत अहोरात्र रुग्णांना सेवा देत सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून सजगता दाखविल्याबद्दल कोविड नोडल अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख, डॉ. प्रवीण डुमणे, डॉ. विशाल वडगावकर, डॉ. सुश्रुत डंबळ, डॉ. शकील अहमद खान, डॉ. अनुराधा लोखंडे यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी सुधीर पाटील, लहू लोमटे व सुरेश गायकवाड यांचा तर कला क्षेत्रातील दिपाली नायगावकर व कोरोना काळात नगर परिषदेच्यावतीने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपमुख्य अधिकारी पृथ्वीराज पवार, संजय कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे व विलास गोरे यांचा तसेच रुग्ण सेवेबद्दल परिचारिका सुमन जादवकर, वाहिदा शेख, उषा दाणे, संध्या निकम, सुरेखा जाधव व निलेश पाचभाई यांचा तर साहित्य क्षेत्रातील युवराज नरळे यांचा तसेच विद्युत पुरवठा सुरळीत ठेऊन उत्तम सेवा दिल्याबद्दल महावितरणच्या अभियंता निलांबरी कुलकर्णी यांचा तर रमाई आवास बांधकाम पूर्ण केल्याबद्दल संगीताताई गजधने व लक्ष्मी झेंडे यांचा उपस्थितांच्या हस्ते फेटा, शाल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, पुरस्कार प्राप्त संजय निंबाळकर हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नसल्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार सोमनाथ गुरव यांनी मानले. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नागरिक उपस्थित होते.