दैनिक जनमत : कंत्राटदाराने कापले प्रशासनाचे नाक?

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Monday, August 30, 2021

कंत्राटदाराने कापले प्रशासनाचे नाक?

 

दर्जाहीन कामाचा प्रताप खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच

उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख ठिकाण. मात्र याच ठिकाणच्या कामात कंत्राटदाराने सुमार काम करून प्रशासनाचे नाक कापल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती.

 गेले वर्षभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. १५ दिवसापूर्वीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे. आणि काही दिवसातच दर्जाहीन कामाचा अनुभव जिल्हावासियांना आला आहे. प्रवेशद्वारासमोर असलेली लोखंडी जाळी मोडून पडली आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि त्याचा दर्जा चांगला असेल की नाही याबाबत साशंकता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून प्रवेशद्वाराच्या कामावर ८ ते १० लाख खर्च केल्याची प्राथमिक माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारावर काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून संपूर्ण प्रवेशद्वार कामाच्या दर्जाची पुन्हा तपासणी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.