सक्षणा सलगर यांनी अर्ध्यात सोडला कार्यक्रम
उस्मानाबाद - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतात तसे आरोप प्रत्यारोप, श्रेयवाद देखील होत असतात. विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम देखील जोरात सुरू होतात. असाच कार्यक्रम उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथे काल दि ०२ सप्टेंबर रोजी झाला. त्यात जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील आणि राष्ट्रवादीच्या पाडोळी गटाच्या सदस्या यांच्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गासाठी असलेल्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान श्रेयवादाला तोंड फुटले आहे.
मेंढा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पालखी प्रदक्षिणा रस्त्याचे आज माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मंदिराच्या समोरच्या ओट्यावर एक छोटेखानी कार्यक्रम झाला.प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांचे भाषण झाले तदनंतर अर्चना पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली आणि मेंढा गावात विकासकामांना निधी आणल्याचे सांगितले यावर जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांनी आक्षेप घेतला या गटाची सदस्य मी आहे निधी आणण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मंदिरात तरी खोटे बोलू नका असा स्वर काढत त्या कार्यक्रमातून निघून गेल्या. या कार्यक्रमानंतर मेंढा गावात या प्रकाराची चर्चा दिवसभर होती.
निधी कोणी आणला त्याचे रेकॉर्ड चेक करा - सक्षणा सलगर
मेंढा गाव माझ्या जिल्हा परिषद मतदार संघात येते तिथल्या विकास कामासाठी मी केलेल्या मागणीनुसार निधी मिळाला. जिल्हा परिषदेचे रेकॉर्ड चेक करून बघितल्यास कोणी मागणी केली आणि कोणी निधी आणला हे समजेल. गेल्या पाच वर्षात अर्चना पाटील कधीच गावात आल्या नाहीत. आज येऊन मी निधी आणला सांगून श्रेय घेणे चुकीचे आहे. मतदार संघात येण्याला विरोध नसून श्रेय घेण्याला माझा विरोध असल्याची प्रतिक्रीया सक्षणा सलगर यांनी दिली.