खासदार साहेब आपणही मोदींच्या आशिर्वादानेच निवडुन आला आहात : नितीन काळे
उस्मानाबाद -

खासदार साहेब सोयाबीनच्या भावातील घसरण ही बाब फक्त सरकारच्या हातातील मुद्दा नाही तुमच्या भावनिक राजकारणासाठी पंतप्रधानाना बदनाम करू नका कारण तुम्ही संसदेत सुद्धा फक्त आणि फक्त मोदींच्याच कृपेने पोहचला आहात हे लक्षात असू द्या. असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. खा. ओमराजे निंबाळकर यांनीमोदीसाहेबाच्या आर्शिवादाने सोयाबीनचे दर पडले असे प्रसिद्धीपत्रक काढले होते त्याला काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सोयाबीनचे दर शिकागोमध्ये सीबॉट (CBOT)येथे जागतिक स्तरावर ठरतात, याची कल्पना खासदारांना असेल अशी अपेक्षाही आम्ही करत नाही. मात्र ज्यांच्या नावावर आपण निवडून आलात, त्यांच्याबाबत विधान करताना त्या विषयाचा निदान थोडा तरी अभ्यास करायला हवा. एकूणच जागतिक स्तरावर सोयाबीनच्या दरामध्ये एकाएकी ऐतिहासिक घट झाली आहे. व आपण गुगल सर्च करण्याचे कष्ट घेतले तर ते लगेच बघायला मिळेल. कोविड महामारी मध्ये सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये कपात करणे गरजेचे होते, सोयाबीन खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये ४२.५% वरून ३७.२५% घट करण्यात आली आहे. या आयात शुल्कातील बदलामुळे सोयाबीनच्या दरात घट झाली असं म्हणणं म्हणजे अज्ञानाचचं नाही तर हास्यास्पद आहे.

तसेच तुम्ही सोयाबीनचे भाव घसरले हा मुद्दा मांडलात हा एक मुद्दा आहे. मात्र केंद्र सरकारने सोयाबीनच्या आयात शुल्कात केवळ 5% कपात केली असता सोयाबीनचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे ढासळू शकतात? याबाबत सविस्तर माहिती घेतली असता भावातील ही घसरण जागतिक बाजारपेठेतील चढ उतारावर अवलंबुन आहे.

मागील काही महिन्यात खाद्य तेलाच्या दरामध्ये जवळपास 80 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पाम तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल या खाद्य तेलाच्या आयात शुल्कामध्ये घट करण्यात आली आहे. 


 ऐन सोयाबीनच्या हंगामामध्ये आज एवढा दर यापूर्वी कधीही नव्हता. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच आजवर मोदी सरकारने निर्णय घेतलेले आहेत. ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा कृषिमंत्री असताना देखील सोयाबीनचा भाव चार हजाराच्या पुढे गेला नाही. ऐन हंगामात तर ३००० सुद्धा कधी शेतकऱ्यांना मिळाला नाही. मात्र आज ऐन हंगामात सोयाबीन सहा हजारा पेक्षा जास्त दराने विकले जात आहे. मोदी सरकारचा नेहमीच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न आहे व राहणार आहे.

ज्यांच्या मुळे आपण खासदार झालात, त्या व्यक्तीबाबत व त्यांच्या निर्णया बाबत बोलताना आपण थोडा तरी विचार करायला हवा मात्र अशी अपेक्षा करणं उस्मानाबाद करांनी सोडून दिलं आहे. 

शेतकऱ्यांना जोडून पंतप्रधानांना बदनाम करण्यापेक्षा कधीतरी स्वतःच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय काम केले याबाबत सर्व सामान्यानां माहिती द्यावी. अशी आमची मागणी आहे. असे काळे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते खा. ओमराजे निंबाळकर

मोदीसाहेबाच्या आर्शिवादाने सोयाबीनचे दर पडले - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर  

  देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर कोसळत असुन केंद्र सरकारनं 12 लाख टन जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसीच्या आयातीला दिलेली परवानगी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचा घणाघात खासदार ओमराजे निंबाळकर यानी केला आहे.मोदी सरकारच्या अनेक निर्णयामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागत आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताऐवजी व्यापाऱ्यांचा प्राधान्याने विचार करत असल्यामुळेच शेतकऱ्यावर ही वेळ आल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले आहे. 

सोयाबीन दरामध्ये होत असलेली घट पाहता सोयाबीन उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.मागील पंधरा दिवसांपूर्वी 10 ते अकरा हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजारावर आले आहेत.एका बाजुला यंदा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मोठा फटका बसला असुन अगोदरच उत्पन्नात घट झाली आहे.एकरी उतारा घटल्याने अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दराच्या घसरणीचाही तोटा होत आहे.सोयाबीन पिकातून उत्पन्नाची आशा असतानाच केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडशी आलेला घासच हिरावुन घेतल्याचे खासदार ओमराजे यांनी म्हटले आहे.सोयाबीनचे भाव यंदा दहा हजाराच्यावर राहतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्याप्रमाणे भावही चढे राहिले होते, जेव्हा केंद्राने आयातीचा निर्णय जाहीर करण्याचा विचार चालु केला त्याच दिवसापासुन आतापर्यंत हळुहळु दर कोसळत असल्याचे चित्र आहे.अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचे महापाप भाजपच्या सरकारने केले आहे. हे पाप देशाच्या कोणत्याही पवित्र नदीत धुवुन निघणार नाही असा टोलाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post