सलगरा,दि.५(प्रतिक भोसले)
शनिवारी झालेल्या पावसाने तुळजापूर तालुक्यात विविध भागात चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, शनिवार दि.४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास सुरू झालेला पाऊस अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह झाला आहे. या मध्ये तालुक्यातील सलगरा (दि.) सह गंधोरा, किलज येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पावसासह जोरदार वाऱ्यामुळे जोमात आलेले ऊसाचे फड आडवे झाले आहेत. आडवा झालेला ऊस सरळ करणे कठीण असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास आडवा झालेला ऊस कुजून त्याला उंदरे लागण्याची भीती आहे, आणि त्यातच ऊस लोळल्याने त्याला कोंब फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. लोळलेल्या उसाला साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर तोडणीसाठी पिळवणूक करतील अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वाऱ्यामुळे हाताशी आलेले हक्काचे ऊसाचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
शनिवारी रात्री पडलेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या मुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. बदलते वातावरण व अती पाऊस या मुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून येत आहे.