दैनिक जनमत : अनुदानास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई शेतकऱ्यांची मागणी

Monday, November 29, 2021

अनुदानास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई शेतकऱ्यांची मागणी

 उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथील शेकडो शेतकऱ्यांना खरीप अनुदान हे वेळेत न मिळाल्याने  येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फरफट झाली होती.

 या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे राज्य सरकारने सर्व बाधित शेतकऱ्यांना अनुदान म्हणून ७५ टक्के पहिला हप्ता म्हणून हेक्टरी ४९०० रुपये दिवाळी सणा दरम्यान दिले होते. मात्र टाकळी (बेंबळी) येथील शेकडो शेतकऱ्यांना दिवाळी झाली तरी अनुदान मिळाले नव्हते, तेव्हा गावातील अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आणि अनुदान जमा करण्याचा ठेका दिलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेत हेलपाटे मारले होते, अनुदान लवकर जमा व्हावे यासाठी सतत पाठपुरावा केला होता आणि अनुदान त्वरित जमा व्हावे म्हूणन माध्यमांनी देखील ही लावली होती, त्यानंतर २२ नोव्हेंबर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते.

राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना दिवाळी दरम्यान अनुदान जमा होईल  असे आश्वासन दिले होते, इतर अनेक गावचे अनुदान जमा ही झाले मात्र टाकळी(बेंबळी) येथील शेकडो शेतकरी हे अनुदानापासून वंचित होते.  अनेक शेतकऱ्यांनी अनुदान आज जमा होईल, उद्या जमा होईल या आशेवर तहसील कार्यालयात , अनुदान जमा करायला ठेका दिलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेत हेलपाटे मारून स्वतःची फरफट करून घेतली होती. अनेक शेतकऱ्यांनी वेळेत अनुदान जमा न झाल्यामुळे बेभाव सोयाबीन विकून, काहींनी हात उसने करून, कोणी व्याजाने पैसे काढून दिवाळी साजरी केली तर अनेकांनी दिवाळीच साजरी केली नव्हती. 

त्यामुळे आज टाकळी(बेंबळी) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनटक्के यांनी आज (दि.२९)उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे अनुदान वेळेत जमा न करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून मागणी केली आहे.