दैनिक जनमत : कावड मिरवणुकीने कंडारी यात्रेस सुरुवात

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, April 23, 2022

कावड मिरवणुकीने कंडारी यात्रेस सुरुवात

 


कंडारी (शंकर घोगरे)

 भैरोबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत कावडीची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. यावेळी अनेकांनी नवसाचे तोरण बांधले पायघड्या घातल्या . महाराष्ट्रासह आंध्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या परंडा तालुक्यातील कंडारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेस काल दिनांक 23 रोजी कावड मिरवणुकीने सुरुवात झाली आहे.

    गेली दोन वर्ष करोनामुळे भैरवनाथ   यात्रेवर निर्बंध लादले होते. यावर्षी करोना रुग्णांत लक्षणीय घट झाल्याने यंदा  यात्रेवरील सर्व निर्बंध हटवले असल्याने यात्रा संपन्न होत आहे.

परंपरेनुसार दुपारी साडेबारा वाजता सुतार नेटवरून सनई चौघड्याच्या स्वरात ढोल-ताशांच्या गजरात हलगीच्या तालावर भैरवनाथाच्या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. मुख्य रस्त्यावरून गणपती मंदिर, मारुती मंदिर, मार्गे भैरवनाथ मंदिरास प्रदक्षिणा घालून मंदिरा समोर ठेवण्यात आली. यावेळी देवाच्या नावानं चांगभलं चा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली . त्यानंतर गावकऱ्यांनी देवास आंबील पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. परंपरेनुसार रात्री ठीक बारा वाजता भैरवनाथ जोगेश्वरी विवाह संपन्न झाला. लग्न सोहळ्यासाठी बीड आंबेजोगाई लातूर उस्मानाबाद इतर भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

 दरवर्षी यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा करोनाचे संकट दूर झाले असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. कावड मिरवणुकीच्या वेळी बाळासाहेब पडघन, भैरवनाथ शिंदे, मा. जि प सदस्य धनंजय मोरे, माजी सरपंच विश्वास मोरे ,उपसरपंच राहुल डोके, विशाल देवकर, दिलीप मोरजकर, आदेश निंबोळे ,दादासाहेब घोगरे, सारंग घोगरे, भाऊसाहेब तीबोळे ,नवनाथ तीबोळे, हरी घोगरे, यांचे सह, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आज दिनांक 24 रोजी दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होणार असून कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.