क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून जिल्हा परिषद घेणार प्रतिभावंत खेळाडूंचा शोध

 

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
उस्मानाबाद दि.१८ :

उस्मानाबाद जिल्ह्यास वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रीडापटूंचा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी जिल्ह्याच्या नावलौकीकामध्ये भर घातलेली आहे.  जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य प्राप्त किंवा पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यातील क्रीडा कौशल्य वृद्धिंगत करून जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शाळा स्तर, बीट स्तर,तालुका स्तर व अंतिमतः जिल्हा स्तरावर होणार आहेत. जिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांना बालेवाडी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षणासाठी पाठविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच  विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. या गुगल लिंक मध्ये माहिती भरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना कळविण्यात आलेले आहे. दिनांक १८/०५/२०२२ पर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी शाळांनी केलेली आहे. 

  जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व पालकांपर्यंत हा संदेश जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विविध खेळांमध्ये पारंगत असलेल्या मुलांना त्यांच्या पुढील प्रगतीस वाव मिळणे शक्य होईल. याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपल्या पाल्यातील क्रीडा कौशल्य विचारात घेऊन सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे विद्यार्थी ज्या गावांमध्ये वास्तव्यास असेल त्या गावातील शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या

 https://forms.gle/or8pWAjrmCuxMqKV8

 या गुगल लिंक वर माहिती भरण्यात यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment