अखेर जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण सोडत जाहीरसर्वसाधारण १८, ओबीसी ८ व अनु. जाती ५ महिलांसाठी संधी तर

अनु. जाती ५ पुरुष, १ अनु. जमाती व १७ प्रवर्ग खुले

उस्मानाबाद दि.२८ (प्रतिनिधी) - ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार न्यायालयात लटकल्याने राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे मार्चमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आजपर्यंत घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या निवडणुका व त्यांचे आरक्षण केव्हा घोषित होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांनी दि.२८ जुलै रोजी या आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ५ तर  पुरुषांसाठी ५ तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी ८ तसेच सर्वसाधारण महिलांसाठी १८ व खुल्या प्रवर्गासाठी १६ व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ अशा एकूण ६१ गटांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. प्रथम ६१ गटांपैकी प्राधान्य क्रमाने अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणासाठी वाशी तालुक्यातील पारगाव, लोहारा तालुक्यातील आष्टा कासार, तुळजापूर तालुक्यातील जळकोट, काटी, भूम तालुक्यातील देवळाली, वालवड व ईट, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी, केशेगाव व बेंबळी या गटांसाठी चिट्टया काढण्यात आल्या. यापैकी देवळाली, ईट, काटी, पारगाव व केशेगाव हे गट अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर उर्वरित आष्टा कासार, जळकोट, कोंड, बेंबळी व वालवड हे अनुसूचित जातीच्या पुरुषासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, महसूलचे तहसिलदार प्रवीण पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ व नायब तहसिलदार पंकज मंदाडे यांनी सहाय्य केले. 

_______________________________

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी कळंब तालुक्यातील खामसवाडी तर परंडा तालुक्यातील डोण्जा, जवळा (नि) व आसू तसेच तुळजापूर तालुक्यातील नंदगाव तर लोहारा तालुक्यातील कानेगाव तसेच उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु.) व करजखेडा हे ८ गट महिलांसाठी तर 

पुरुषांसाठी वाशी तालुक्यातील पारा तसेच परंडा तालुक्यातील आनाळा व खासापुरी तर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व तामलवाडी तसेच लोहारा तालुक्यातील माकणी व उमरगा तालुक्यातील तलमोड व तुरोरी हे ८ गट राखीव ठेवण्यात आले आहेत.


______________________________


सर्वसाधारण गटांसाठी भूम तालुक्यातील पाथरूड‌तर कळंब तालुक्यातील मंगरूळ, डिकसळ, शिराढोण, नायगाव, देवळाली व येरमाळा तसेच उस्मानाबाद तालुक्यातील जागजी व सांजा तर परंडा तालुक्यातील शेळगाव तर लोहारा तालुक्यातील सास्तुर व जेवळी तसेच उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी, येणेगुर, दाळिंब व आलूर हे गट सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.


_______________________________


 भूम तालुक्यातील माणकेश्वर वाशी तालुक्यातील तेरखेडा व ईटकुर कळंब तालुक्यातील मोहा उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, आळणी, येडशी, उपळा (मा), पाडोळी (आ) व कारी तर तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ, अणदूर, मंगळूर, काटगाव, खुदावाडी तर उमरगा तालुक्यातील बलसूर, गुंजोटी व कदेर हे गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, महसूलचे तहसिलदार प्रवीण पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, नायब तहसिलदार पंकज मंदाडे यांनी कामकाज पाहिले. 


______________________________


प्रत्येक प्रवर्गासाठी १ व २ अशा प्राधान्य क्रमाने आरक्षण जाहीर करण्यात आले. तर जास्ती लोकसंख्या असलेल्या व यापूर्वी आरक्षणाचा लाभ लाभ देण्यात आलेल्या गटांना पुन्हा आरक्षण देण्यासाठी तिसरा क्रमांक देण्यात आला. तिसरा क्रमांक देण्यात आलेल्या गटांच्या नावाच्या चिट्टया एका काचेच्या बरणीत सभागृहात सर्वासमोर बंद करण्यात आल्या. त्या चिट्टया येथील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेतील इयत्ता चौथी ते सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या अपेक्षा प्रताप कदम चैत्राली नेताजी कदम ऐश्वर्या नारायण बनसोडे व तनया बालाजी पवार या विद्यार्थिनींच्या हस्ते काढण्यात आल्या. या विद्यार्थिनींनी काढलेल्या चिट्टीच्या आधारेच नागरिकांचा मागास (ओबीसी), अनुसूचित जाती व महिला या प्रवर्गाचे आरक्षण घोषित करून ते निश्चित करण्यात आले. 


_____________________________


हे आरक्षण घोषित होण्यापूर्वी अनेक दिग्गज आणि आपापल्या ठराविक मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते मतदार संघ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जाती व महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचे भ्रमाचे भोपळे हवेत विरले आहेत. त्यांना दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार असून पुन्हा नव्याने मतदार संघाची बांधणी करायची कशी ? या विचाराने त्यांची निराशा झाली असून ते निवडणूक लढवावी किंवा नाही ?अशा द्वंद्वात अडले आहेत. 


_______________________________


एकीकडे सर्व राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून तिकीट घ्यावे ? अशी संभ्रमावस्था सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे कोणाबरोबर युती व आघाडी करावी असा पेज जिल्ह्यातील पक्ष प्रमुखासमोर निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post