सोयाबीन पिकातील विषाणूजन्य पिवळा केवडा (Soybean Yellow Mosaic Virus) रोगाचे व्यवस्थापनउस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन पीक ३० ते ४० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहे, याच बरोबर सतत ढगाळ वातावरण व अधून मधून लख्ख सूर्यप्रकाश असे वातावरण असल्याने गवतांचा प्रादुर्भाव होत आहे. कोणत्याही पिकांची पेरणी करताना एक सुयोग्य अंतर शिफारशीत केले जाते, जेणेकरून पिकामध्ये हवा खेळती राहील परंतु ज्या क्षेत्रामध्ये ही जागा गवताने व्यापली आहे अश्या क्षेत्रात, किंवा बांधावर गवत जास्त असेल अशा क्षेत्रात रस शोषणाऱ्या किडींचा उदा. पांढरी माशी, मावा, तुडतुडे इ. प्रादुर्भाव जास्त होतो.  या किडी विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.


लक्षणे:-

सोयाबीन च्या पानावर लहान शिराच्या बाजूला पिवळे- हिरवे असे एक-आड -एक चट्टे पहावयास मिळतात, कालांतराने असे पान वाळून जाते.

रोगाची लागण:-

विषाणूजन्य रोगांमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे रोगाची लागण आणि त्याचा प्रसार होण्याचे मध्यम ओळखणे व त्याचे नियंत्रण करणे.

शिवारातील एखाद्या झाडावर वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ असे झाड उपटून नष्ट करावे. जेणेकरून अश्या झाडावरील पांढरी माशी इतरत्र जाऊन रोगाचा प्रसार करू नये. असे प्रादुर्भावग्रस्त झाड रोगाच्या लागणीस कारणीभूत ठरते. सोयाबीन मधील विषाणूजन्य पिवळा केवडा या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडी मार्फत होतो,त्यामुळे पांढरी माशी च्या नियंत्रण करण्यासाठी खालील उपाययोजना करावी.

व्यवस्थापन :

१) पीक २०-२५ दिवसांचे असताना सुरुवातीस ५% निंबोळी अर्काची फवारणी केल्यास पांढरी माशी पानावर स्थिरावत नाही.

२) पांढरी माशी पिवळ्या रंगाला आकर्षित होत असल्याने प्रति हेक्टरी २० ते २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

शेजारी ऊसाचे क्षेत्र असेल तर ऊसाच्या बाजूने जास्त पिवळे चिकट सापळे लावावेत.

३) रासायनिक कीटकनाशकांमध्ये थायमिथोक्झांम २५% डब्लू जी ४० ग्रॅम   कीटकनाशकाची प्रति एकर २०० लिटर पाणीतुन फवारणी करावी.


डॉ. श्रीकृष्ण झगडे,

शास्त्रज्ञ, पीक संरक्षण

कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर

No comments:

Post a Comment