बैलपोळा सणानिमित्त रंगीबेरंगी साहित्यांनी दुकाने सजली
सलगरा,दि.२४ (प्रतिक भोसले) - 

श्रावण महिन्याची सुरूवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा-राजाचा सण म्हणजेच 'पोळा' पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र, सर्जा-राजाचा हा दिवस मानाचा असतो. शेतकरी व त्याच्यासाठी अपार कष्ट करणार्‍या बैलांचा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. वर्षभर शेतात काम करणार्‍या सर्जा - राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्या दिवशी आहे. शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने रुढी-परंपरेने साजरा करतो. म्हणून बैल पोळाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या साहित्याने दुकाने यंदा दहा-बारा दिवस अगोदरच उभारली गेली आहेत.

___________________________________________

यंदा बैल पोळ्यासाठी लागणार्‍या बहुतांश साहित्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोळ्यावर महागाईचे सावट दिसून येत आहे. बैलांना सजवण्यासाठी आवश्यक असणारे पैजण, शिंगासाठी शेंदुरी, कलर, घुंगरमाळा, गळ्यातील चामडीचे पट्टे, येसण, सुताचे गोंडे, कासरा, मणी माळा, तिरंगा माळ, पिवडी, यांच्या सह ईतर शोभेच्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. 

दुकानदार, कालिदास भानुदास लोमटे

____________________________________________

यंदा कोरोना निर्बंधमुक्त बैलपोळा साजरा होणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत, बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य परिसरातील गंधोरा, वाणेगाव, वडगाव, जवळगा, किलज, बेलवाडी आदी गावांमधून येणारे शेतकरी हौसेने खरेदी करताना दिसत आहेत. 

दुकानदार, बालाजी दिगंबर माळी

___________________________________________

आजूबाजूच्या गावातूनही शेतकरी इथे बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येऊ लागले आहेत, मात्र महागाई मुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे पोळा सण साधेपणाने साजरा केला जात होता, मात्र यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या मुळे काही झालं तरी पोळ्याला बैलजोडीची हौस करायला आम्ही मागं-पुढं बघणार नाय असा सूर शेतकऱ्यांमधून येत आहे. 

दुकानदार, माधव (दाजी) दशरथ लोमटे

Post a Comment

Previous Post Next Post