एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण असा नारा देत गंधोरा ग्रामस्थ एकवटले


सलगरा,दि.१७(प्रतिनिधी)

दि.१९ सप्टेंबर रोजी कळंब येथे होणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाच्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावातील समन्वयक समितीकडून व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती, तरुणांना मार्गदर्शन, बैठकांचे आयोजन, दि.१६ सप्टेंबर रोजी झालेली ग्रामसभा या वरून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण या धोरणावर मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्क्याच्या आत ते पण कायद्याच्या चौकटीतूनच आरक्षणाची मागणी असल्याचे गावातील समन्वयक समितीने सांगितले. समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची असून मागासलेपणामुळे दिवसेंदिवस मराठा समाजाचे शिक्षणातील प्रमाण घटत आहे. हि बाब सामाजिक न्यायाच्या दृष्टीने गंभीर आहे. त्या अनुषंगाने विदर्भ आणि खानदेशातील कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा हे एकच असून कुणबी - मराठा, मराठा कुणबी, यांच्या प्रमाणे मराठा समाजाला ईतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) ५०% च्या आतील आरक्षण मिळावे या साठीचा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. अन् त्या ठरावास सर्वानुमते मंजुरी सुद्धा देण्यात आली. 


मराठा समाजाला आता आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि ते पण ओबीसींच्या ५० टक्के आरक्षणामधूनच मिळावे तेच आरक्षण टिकू शकते. त्या मुळे मराठ्यांच्या हक्काच आरक्षण मिळविण्यासाठी आता पुन्हा एकदा आपली एकी दाखवून येणाऱ्या पिढीसाठी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कळंब येथील मोर्चाला जायचं आहे. हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माविरोधात नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सर्वात जास्त आत्महत्या या मराठा समजाच्या आहेत. मराठ्यांची बिकट अवस्था झाल्यामुळे आरक्षणाची गरज ओळखून सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत १९ तारखेच्या महामोर्चात सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधून आरक्षणाची मागणी करायची आहे. मोर्चा हा शांततेत - शिस्तीत, पोलीस, समन्वयक, स्वयंसेवक सूचना करतील त्या प्रमाणेच होईल. विशेष म्हणजे या मोर्चाला गालबोट लागू नये या साठी समन्वयक काळजी घेत आहेत. तरी पण जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे समितीने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment