सलगरा,दि.३०(प्रतिक भोसले)
कोहिजन फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्वांगीन ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत विविध लोकोपयोगी कामाची सुरुवात तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई) गावात दि.२९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. यावेळी शेळी व कोंबडी उत्पादक महिला कंपनीचे भूमीपूजन, वृक्षारोपन, नविन बंधारा जल पूजन, जलशुध्दीकरण युनिटचे लोकार्पन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी प्रकल्प व्यवस्थापक डॉ. दयानंद वाघमारे यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्याधिकारी विलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालिका श्रीमती प्रांजल शिंदे, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर चे अधिष्टाता प्रो. रमेश जारे, गट विकास अधिकारी, तुळजापूर जयसिंगराव मरोड यांसह जवळगा मेसाईचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची उपस्थितांनी वृक्षारोपनाने सुरवात करुन नमूद विविध उपक्रमांचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, जिथे मानवी शक्तीने सहज काम होईल तिथे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करावा, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी, कापडी पिशव्यांचा वापर करावा, पाण्याचा गैरवापर थांबवुन काळजीपूर्वक वापर करावा व इतरांनाही सांगावे, वृक्षारोपण करून त्यांची काळजी घेतली पाहिजे, सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात वाटा उचलला पाहिजे. या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक व जाणीवपूर्वक पार पाडून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाला हातभार लावला पाहिजे.
विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनात जनसहभाग महत्त्वाचा असल्याचे सुद्धा त्यांनी पटवून दिले.