दैनिक जनमत : जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी ई-केवायसी करण्यासह आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Tuesday, October 11, 2022

जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी ई-केवायसी करण्यासह आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे

 


उस्मानाबाद दि.११ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकरी लाभार्थ्यांनी आपली ऑनलाईन  ई- केवायसी केलेली नाही. खास त्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी आपली कार्ड काढण्यासाठी नोंदणी केलेली नाही. त्यांच्यासाठी दि.१२ ते १३ ऑक्टोबर असे सलग ३ दिवस ई-केवायसी व नोंदणीसाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्वांनी आपली गाव स्तरावर शिबीरामध्ये नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.११ ऑक्टोबर रोजी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे २ लाख ७७ हजार शेतकरी लाभार्थी असून त्यापैकी २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी ई- केवायसी केलेली आहे. तर ५४ हजार ४१९ शेतकऱ्यांनी केलेली नाही. तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये १ लाख ३२ हजार ८४ कुटूंब पात्र आहेत. तर या कुटुंबातील ४ लाख ६८ हजार १७४ लाभार्थी पात्र असून त्यापैकी आतापर्यंत केवळ ७७ हजार ६५४ लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड तयार करून घेतले आहे. विशेष म्हणजे यापैकी १७ हजार ४७ लाभार्थी रुग्णांना या योजनेच्या अंगीकृत रुग्णालयाद्वारे उपचार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले मूळ शिधापत्रिका किंवा प्रधानमंत्री यांचे पत्र व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य ओळखपत्र सोबत घेऊन जवळच्या सीएससी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधून आयुष्यमान कार्ड साठी आवश्यक असणारी ई-केवायसी करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक गावातील लाभार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी ठिकाण व वेळेची यादी ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या प्रभागात दर्शविण्यात आलेल्या आहेत. 

-------------------------------------------------

जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय उमरगा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय परंडा स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर ग्रामीण रुग्णालय भूम व ग्रामीण रुग्णालय वाशी ही शासकीय रुग्णालय आहेत. तर सुविधा हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, वात्सल्य हॉस्पिटल व नवोदय हॉस्पिटल उस्मानाबाद तर श्री विठ्ठल हॉस्पिटल वाशी, कृष्णा हॉस्पिटल कळंब तसेच साई हॉस्पिटल, चिंचोली हॉस्पिटल, हॉस्पिटल, डिजिटल हॉस्पिटल व डॉ. के.डी. शेंडगे हॉस्पिटल, उमरगा या १८ हॉस्पिटलमध्ये या योजने अंतर्गत उपचार केले जातात.


-------------------------------------------------

विशेष सेवा प्रकार १ मध्ये जळीत, हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार, त्वचारोग, कानाक व घसा रोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, संसर्गजन्य आजार, जठरांत्र मार्गाचे रोग, नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, मज्जातंतूचे विकार, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया बालरोग कर्करोग, आकस्मित वैद्यकीय उपचार फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार, संधिवात संबंधी उपचार, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया व मानसिक आजारांचा समावेश आहे.


-------------------------------------------------


 विशेष सेवा प्रकार २ मध्ये हृदयरोग आकस्मित सेवा, अंतःस्त्राव संस्थेचे विकार, सर्वसाधारण औषध शास्त्रचिकित्सा, व्याधी चिकित्सा, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, कर्करोगावरील औषधोपचार, मूत्रपिंड विकार, मज्जा तंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया बालरोग शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी कृत्रिम अवयव व उपचार किरणोत्सवर्गाद्वारे कर्करोग चिकित्सा, जठर व आंत्रविकाराच्या शस्त्रक्रिया, मुत्रवह संस्थेच्या विकारावर शस्त्रक्रिया व जबडा व चेहऱ्याच्या अस्थिवरील शस्त्रक्रियांचा समावेश.