दैनिक जनमत : रोहयो घोटाळ्याचे कनेक्शन नागपूर व्हाया बीड?

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Monday, November 21, 2022

रोहयो घोटाळ्याचे कनेक्शन नागपूर व्हाया बीड?

खऱ्या सूत्रधारांना कोण वाचवतंय? उस्मानाबाद - पंचायत समिती उस्मानाबाद मधील रो ह यो घोटाळ्यातील कनेक्शन आता नागपूर पर्यंत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शोष खड्ड्यांच्या कामांत मोठी अफरातफर झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यांनतर अधिकारी कर्मचाऱ्यांसह ७ जणांवर कारवाई देखील करण्यात आली होती मात्र हि कारवाई मुख्य सूत्रधारांना वाचविण्यासाठी करण्यात आली आहे कि काय असा प्रश्न पडू लागला आहे. शोष खड्ड्यांच्या कामावर जे मजूर दाखवण्यात आले आहेत त्यांचे बोगस जॉब कार्ड बनवण्यात आले आहेत. काही तांत्रिक बाबी पाहता एका मजूराचे जॉब कार्ड आधीच अस्तित्वात आहे त्यात काही दुरुस्ती करायची असल्यास राज्याच्या कार्यालयातून ही दुरुस्ती होते मग एकाच मजूराचे दुसरे जॉब कार्ड काढून देणारी व्यक्ती नागपूर कार्यालयात नसेल हे कशावरून? त्याला नेमका कोणाचा वरदहस्त? पंधरा पंधरा मजुरांचे पैसे एकाच खात्यावर जमा करण्यात आले आणि ते खाते बीड जिल्ह्यातील आहे ही माहिती प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना माहिती असताना देखील त्या खातेदरांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? घोटाळ्यात भागीदार असलेले अधिकारी, कर्मचारी आणि बोगस खातेदार यांच्याकडून वसुली होणे अपेक्षित असताना केवळ निलंबित केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली करून प्रशासन कोणाला वाचवू पाहत आहे? हे पैसे ज्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जमा झाले त्याची चौकशी अद्यापपर्यंत प्रशासनाने का केली नाही?

घोटाळा झालेल्या काळात तीन गट विकास अधिकारी होते कारवाई मात्र एकावरच कशी? छोटे मासे गळाला लावून बडे मासे पुन्हा घोटाळा करण्यासाठी मोकळे सोडायचे आहेत का अशी चर्चा आता उस्मानाबाद जिल्ह्यात रंगू लागली आहे.