दैनिक जनमत : १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्याने पाणीबाणी?

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Wednesday, February 22, 2023

१५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळाल्याने पाणीबाणी?

 


उस्मानाबाद - शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीबाणी सुरू असून आठ आठ दिवस पाणी मिळत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला मात्र वीज पुरवठा खंडित होण्यामागे केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी न मिळणे हे कारण असल्याचे बोलले जात आहे. मार्च २०२२ पासून आजपर्यंत हा निधी अद्याप अप्राप्त आहे. जवळ पास १५ कोटीची ही रक्कम असल्याचे देखील बोलले जात असून येत्या कालावधीत हा निधी न मिळाल्यास पाणी पुरवठा खंडित होणार आहे. नगर पालिकेच्या न. प. फंडात संपूर्ण बिल भरले जाईल एवढा निधी नाही. कराच्या माध्यमातून जी वसुली होते तीच न. प. फंडात जमा होत असते. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीची पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी मदत होत असते.


 साडे आठ कोटी बिल थकीत

उजनी येथून पाणी पुरवठा होणाऱ्या योजनेसाठी दरमहा ८० लाखांच्या आस पास देयक असते. सोलापूर जिल्ह्यातील दोन पंपिंग स्टेशन चे बिल ५ कोटी ६५ लाख तर उस्मानाबाद जिल्ह्यातील पंपिंग स्टेशन चे २ कोटी ५८ लाख रुपये बिल थकीत आहे.


तब्बल तेरा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित

९ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठ्याच्या योजनेचा वीजपुरवठा खंडित झाला होता तो २२ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला मात्र केवळ १० लाख रुपये भरून हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याने लवकरात लवकर बिल न भरल्यास पुन्हा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे बोलले जात आहे. 


आलेले पाणी दूषित? शहरातील जनतेत रोष वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने हातला देवी तलावातून पाणी पुरवठा सुरू केला मात्र शहरात होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात असून हातला देवी तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे का याची तपासणी करण्याचीही मागणी नागरिकांमधून होत आहे.