निती आयोगाचे पटकावले पाचव्यांदा ३ कोटींचे बक्षीस
गुरुजींनी जिल्ह्याची मान उंचावली
उस्मानाबाद दि.३ - उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्हा असून जिल्ह्याला विकसित, प्रगतशील जिल्हा बनविण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलून त्या दृष्टीने विकासात्मक आराखडा तयार करण्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून योजना आखल्या. त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू करून प्रशासकीय यंत्रणांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्ह्याने विविध उद्दिष्टे पूर्ण करीत त्याची तंतोतंत अमलबजावणी केली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले असून सर्व बाबतीत नोव्हेंबर-२०२२-२३ मध्ये उस्मानाबाद जिल्हा देशात अव्वल ठरल्यामुळे उत्तुंग भरारी घेत शैक्षणिक प्रगती केली आहे. त्यामुळे निती आयोगाने ३ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यापूर्वी चार बक्षिसे मिळाली असून हे पाचवे बक्षीस आहे हे विशेष. उस्मानाबाद जिल्ह्याने कृषी क्षेत्र पाठोपाठ शैक्षणिक क्षेत्रात देखील डंका वाजविला आहे. ही अतिशय कौतुकाची कामगिरी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी करून किमया केली आहे.
आकांक्षीत म्हणजे अविकसित (मागास) जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणून विकसनशील बनवण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. २०२२-२३ शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. गतवर्षी पाचवीमध्ये असलेल्या विद्यार्थी संख्या पुढील वर्गात म्हणजे इयत्ता सहावीमध्ये त्याच पटीत वर्ग झाली आहे. यासाठी जिल्ह्याला १०० टक्के गुण मिळालेले आहेत. तर शालेय विद्यार्थिनींना शौचालयाची शंभर टक्के सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच अध्ययन निष्पत्तीमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची गणित व भाषा विषयक संपादकणूकीचे प्रमाणात १०० टक्के सुधारणा झालेली आहे. विशेष म्हणजे २५ वर्षाच्या पुढील वयोगटातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ७८.८५ टक्के झाले आहे. तर शाळा सुरू झाल्यापासून पहिल्या महिन्यांमध्ये शालेय स्तरावर म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात देखील बाजी मारली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर जिल्ह्यातील माध्यमिक शाळामध्ये विद्युत जोडणी केली असल्यामुळे त्या शाळांना आवश्यक ते विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सोयीचे झाले आहे.
------------------------------------------------------------
पहिली ते पाचवीपर्यंतच्या ३० विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एक शिक्षक तर ३५ विद्यार्थ्यामागे एक शिक्षक ज्ञान दान देण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद व आश्रम शाळा समाज कल्याण विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पहिली ते बारावीपर्यंतच्या १ हजार ८२३ शाळा आहेत. यामध्ये जनार्दनाचे धडे विद्यार्थी चांगले पद्धतीने घेत असून शिक्षक देखील चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे पालकांनी देखील यासाठी सहकार्य केल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये चांगला समन्वय घेऊन आला आहे.
-----------------------------------------------------------
डेल्टा रँकिंग पद्धतीने केली निवड
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत देशातील १११ व महाराष्ट्रातील नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांसाठी बक्षीस देताना डेल्टा रँकिंग पद्धतीने निवड केली जाते. त्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्वेक्षण स्वतंत्ररीत्या करण्यात येते. निती आयोगाच्या निकषानुसार हे सर्वेक्षण करून त्यांनी ठरवून दिलेल्या निकषास पात्र ठरलेल्या जिल्ह्यांसाठी बक्षीस दिले जाते.
-----------------------------------------------------------
जिल्ह्यामध्ये २०१७-१८ पासून कृषी, शिक्षण, आरोग्य व आर्थिक यासह इतर ठरवून दिलेल्या निकषांवर कामे केली जात आहेत. कृषी क्षेत्रामध्ये पाण्याची बचत करण्यासाठी तुषार, ठिबक सिंचनचा वापर, बीबीएफ पेरणी यंत्रे, जलस्त्रोतांचे पुनर्जीवन करण्यासाठी खोलीकरण, लांबीकरण आदी कामे करण्यात आलेले आहेत.
-----------------------------------------------------------
शाळा व शिक्षकांसाठी बक्षीस देणार
विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे व समजणारे सुलभ पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपक्रमशील शिक्षक व शाळा घडणे व घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत असून या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडण्याबरोबरच शैक्षणिक प्रगती देखील चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे शिक्षकांसाठी बक्षीस देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिली.
-----------------------------------------------------------
आर्थिक व कृषी क्षेत्र सक्षम करण्यावर भर देणार
हा जिल्हा आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी मुद्रा, प्रधानमंत्री जनधन योजना, वंचित घटकांसाठी विमा योजना, अपघात विमा योजना, जास्तीत जास्त सिंचनाखाली असलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल यासाठी विशेष भर देणार आहे. तसेच छोटे-मोठे उद्योग उभा करून जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे डॉ ओंबासे यांनी सांगितले.