दैनिक जनमत : प्रेयसीच्या हौसेसाठी कर्जबाजारी झालेल्या प्रियकराने केले तिच्याच मुलाचे अपहरण

ताज्या बातम्या, धाराशिव,कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,शेतीविषयक माहिती,योजना,रोजगार संधी

Saturday, February 4, 2023

प्रेयसीच्या हौसेसाठी कर्जबाजारी झालेल्या प्रियकराने केले तिच्याच मुलाचे अपहरण नळदुर्ग (प्रतिनिधी ) - शेअर चॅटच्या माध्यमातून ओळख झालेल्या प्रेयसीच्या हौसेसाठी अमाप पैसा खर्च केला. यात प्रियकर कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने त्यांने त्याने चक्क प्रेयसीच्या सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करत दोन लाख ची खंडणी मागितली. मात्र नळदुर्ग पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवीत अपहरणकर्त्याच्या तावडीतुन मुलाची सुखरूपपणे सुटका करून अवघ्या चोवीस तासात त्या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याबरोबरच अपहरण केलेल्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कामगिरीबद्दल नळदुर्ग पोलिसांचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ३१ जानेवारी रोजी सोलापुर येथील एक कुटुंब विवाह सोहळ्यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे आले होते. विवाह सोहळा संपल्यानंतर  कुटुंबातील सात वर्षाचा मुलगा हरवल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले.त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र मुलगा सापडला नाही. त्यातच अपहरत मुलाच्या चुलत्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. यामध्ये तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असुन त्याला सोडवायचे असेल तर २ लाख रुपये किरण व अपहरत मुलाच्या आईजवळ देऊन त्यांना पाठवुन द्या. अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर रात्री दहा वाजता कुटुंबाने नळदुर्ग पोलिस ठाण्यात येऊन याबाबतची तक्रार दिली.

नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी या तक्रारीची दखल घेऊन याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांना दिली. यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी या अपहरण प्रकरणाचा तपास सुरू केला. यामध्ये अपहरणकर्त्यांनी ज्या मोबाईल नंबरवरून २ लाख रुपये खंडणी मागण्याचा मेसेज पाठविला होता त्या नंबरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नंबर हायटेक वर्चुअल असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी पोलिसांची दोन पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.यावेळी या अपहरण प्रकरणामागे किरण अविनाश लादे वय २५ वर्षे रा. सारोळे ता. मोहोळ जि. सोलापुर हा असल्याचे स्पष्ट झाले. ज्या नंबरवरून मेसेज आला होता त्या नंबरचा शोध सुरू असताना पहिल्यांदा तो अक्कलकोट येथे असल्याचे समजले त्यानंतर त्याचे लोकेशन सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असल्याचे निदर्शनास आले. आरोपींच्या शोधासाठी नेमण्यात आलेल्या पथकाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पहाटे चार वाजता अपहरण कटातील मुख्य आरोपी किरण अविनाश लादे वय २५ वर्षे याला पोलिसांनी मोहोळ येथुन ताब्यात घेऊन त्याला नळदुर्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सकाळी सहा ते नऊ पर्यंत पोलिस किरण कडे चौकशी करीत होते मात्र तो त्याला दाद देत नव्हता. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच किरण याने अपहरण केल्याची कबुली दिली.व अपहरण केलेल्या मुलाला  मित्र किशोर शाहीर तांदळे रा. हरिबोर ता. मिरज, जि. सांगली याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी पोलिस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे, पोकॉ विशाल सगर, अविनाश दांडेकर असे पथक सांगलीकडे रवाना केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोकॉ गोरख शिंदे व शकिला तांबोळी यांचे दुसरे पथक तयार करून तेही तपासासाठी रवाना केले. सांगलीला रवाना झालेले पथक सांगली येथे गेल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन किशोर शाहीर तांदळे वय २८ वर्षे रा. हरिबोर ता. मिरज, जि.सांगली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अपहरत मुलासबंधी विचारले असता किशोर याने सदरील मुलाला सुनिल सदाशिव हजारे वय ३२ रा. रामनगर, सहावी गल्ली सांगली यांच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ किशोर तांदळे यास सोबत घेऊन सुनिल हजारे याच्या घरी जाऊन पीडित मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अशाप्रकारे नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात फिल्मीस्टाईलने अपहरण करून २ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळुन अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचे कौतुकास्पद काम केले. किरण लादे याने प्रेयसी वर केलेले खर्च तिच्याकडूनच वसुल करून झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे मुलाचे अपहरण केले असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अपहरणाचा डाव आरोपींवरच उलटला आहे.आरोपी किरण अविनाश लादे, किशोर शाहीर तांदळे व सुनिल सदाशिव हजारे यांच्याविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.५३/२०२३ कलम ३६४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तीनही आरोपींना अटक करण्यात आली. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पिराजी तायवाडे हे करीत आहेत.

कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती

 चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदा...