क्रीडा मंत्री गिरीष महाजन जर्मनी आणि स्वित्झर्लंड च्या दौऱ्यावर जाणार!

 क्रीडा मंत्री गिरीष महाजन जर्मनी आणि स्वित्झर्लंड च्या दौऱ्यावर जाणार आहेत. १८ मे २६ मे पर्यंत हा दौरा असणार आहे.

राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासन पावले उचलत आहे.याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने (क्रीडा विभाग) फुटबॉल क्लब बायर्न म्युनिच, जर्मनी या जगप्रसिध्द व फुटबॉल स्पर्धांमध्ये अत्यंत यशस्वी असलेल्या संस्थेसोबत फुटबॉल या खेळाच्या प्रशिक्षण व विकासाच्या अनुषंगाने सहकार्य करार केला आहे. त्यानुसार राज्यातील १४ वर्षाखालील २० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना फुटबॉल खेळाच्या अद्ययावत प्रशिक्षणाकरीता जर्मनी येथे पाठविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिच, जर्मनी या संस्थेने तेथील उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, क्रीडा संकुल व्यवस्थापन, खेळाडूंची निवड, अत्याधुनिक प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान यासंदर्भात पाहणी व अभ्यास करण्यासाठी मंत्री गिरीष महाजन तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना जर्मनी येथे आमंत्रित केलेले आहे. त्याचप्रमाणे डॉ. क्लाऊडे स्ट्रीकर, कार्यकारी संचालक, इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ स्पोर्टस सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी (AISTS), लॉसने, स्वित्झर्लंड यांनी मा. मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) यांची मुंबई येथे भेट घेऊन स्वित्झर्लंड येथे योग व मल्लखांब केंद्र स्थापन करण्यासाठी तसेच राज्याच्या क्रीडा क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान, आंतररराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षणाची व क्रीडा

शिक्षणाची जोड देण्यासाठी स्वित्झर्लंड येथील इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ स्पोर्टस सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी (AISTS) या क्रीडा शिक्षण व प्रशिक्षणाकरिता जगप्रसिध्द असलेल्या संस्थेस भेट देण्याची विनंती केली आहे. इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ स्पोर्टस सायन्स अॅन्ड टेक्नोलॉजी (AISTS), लॉसने, स्वित्झर्लंड या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विषयक अभ्यासक्रमांचा / प्रशिक्षणाचा लाभ ऑनलाईन माध्यमातून राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, क्रीडा अधिकारी इत्यादींना देण्याकरिता या संस्थेसोबत करार करण्याचे प्रस्तावित आहे.

No comments:

Post a Comment